अनैतिक संबंधातून महिलेची हत्या, गुन्हा लपवण्यासाठी आईवरच प्राणघातक हल्ला, आई गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरु.

कल्याण :- अनैतिक संबंधातून त्याने नातेवाईक महिलेची गोळ्या घालत हत्या केली तर तिला सोडवण्यास आलेल्या आईवर देखील गोळ्या झाडल्या. आपला गुन्हा लपविण्यासाठी या आरोपीने घरात लुटमार झाल्याचा बनाव केला.
हळदी समारंभांचा फायदा घेत नातेवाईक महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर सोडवण्यास गेलेल्या आईवर देखील आरोपीने प्राणघातक हल्ला केल्याचं पुढे आलं आहे. गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने स्वत:ला देखील जखमी केलं होतं. शेजारी सुरु असलेल्या हळदी कार्यक्रमाचा फायदा घेत तरुणाने नातवाईक महिलेवर हल्ला केला. इतकंच नाही तर त्याने आपल्या आईवर देखील प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील सापर्डे गावात घडली आहे. या हल्ल्यात नातेवाईक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आरोपीची आई गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवन म्हात्रे असं या आरोपीचं नाव आहे.
कल्याण पश्चिम येथील सापर्डे गावात हळदी सभारंभ सुरु असताना हा गुन्हा घडवण्यात आला होता. कार्यक्रमात सगळे व्यस्त असताना समोरच्या घरातून आवाज आल्यानंतर सगळ्यांनी घराकडे धाव घेतली होती. घरात पवन म्हात्रे, पवनची आई भारती आणि पवनची नातेवाईक महिला सुवर्णा घोडे हे तिघे गंभीर जखमी अवस्थे पडले होते. या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सुवर्णा घोडे यांचा मृत्यू झाला. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. काही काही तासातच गुन्ह्याचा छडा लावला.
पवनने अज्ञात लोकांनी आमच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांना दिली. पण या हल्ल्यात पवन जास्त जखमी झाला नसल्याने पोलिसांचा पवनवर संशय बळावला. पवनचे महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये झालेल्या वादातून त्याने तिची हत्या केली तर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या आईवर देखील त्याने हल्ला केला.