जरा याद करो कुर्बानी… 

58

जरा याद करो कुर्बानी… 

श्याम ठाणेदार       

दौंड जिल्हा पुणे 

 मो: ९९२२५४६२९५

दीडशे ते दोनशे वर्ष इंग्रजांच्या पारतंत्र्यात असणाऱ्या भारत मातेला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले. अनेक जण फासावर चढले तर कित्येकांनी इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेलल्या. या वीर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत माता इंग्रजांच्या गुलामीतूम मुक्त झाली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी इंग्रजांनी फाशी दिली होती. आज २३ मार्च हा दिवस शहीदांच्या नावे कोरला गेला गेला आहे.

आजच्याच दिवशी म्हणजे २३ मार्च १९३१ रोजी शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. ९२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी दिली होती. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी आजचा दिवस संपूर्ण देशात शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.

१९२८ मध्ये सायमन कमिशन नावाचे शिष्टमंडळ भारतात आले होते. या कमिशनला विरोध म्हणून लाला लजपतराय यांनी मोठा मोर्चा काढला होता. सायमन कमिशनला विरोध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर इंग्रजांनी लाठीहल्ला केला. या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध संतापाची लाट उसळली. लाला लजपतराय यांच्या मृत्युनंतर देशातील जहाल गटाचे स्वातंत्र्य सैनिक कमालीचे चिडले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आणि अन्य जहाल क्रांतिकारकांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली.

लाला लजपतराय यांच्या मृत्यूच्या एक महिन्याच्या आतच या क्रांतिकारकांनी आपली शपथ पूर्ण केली आणि १७ डिसेंबर १९२८ रोजी ब्रिटिश अधिकारी सँडर्सला गोळ्या घालून ठार केले. काही काळ ते भूमिगत राहिले मात्र फितुरीमुळे ते पोलिसांच्या हाती लागले. ७ ऑक्टोबर १९३० रोजी इंग्लिश कोर्टाने भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर भगतसिंग यांची शिक्षा कमी व्हावी यासाठी फेर याचिका दाखल करण्यात आली मात्र १० मार्च १९३१ रोजी ती याचिका कोर्टाने फेटाळली.

२३ मार्च हा दिवस भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या फाशीसाठी निश्चित करण्यात आला. २३ मार्च १९३१ रोजी सकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी या तिघांनी मेरा रंग दे बसंती चोला …… हे गाणे गायले. फासावर लटकतानाही भारत मातेच्या या सुपुत्रांच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारचे दुःख किंवा पश्चाताप नव्हता उलट भारत मातेसाठी फासावर जात असल्याचा अभिमान होता. आजच्या दिवशी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामीतूम मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. भारत मातेला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य ज्ञात अज्ञात शहिदांना शाहिद दिनी विनम्र अभिवादन!