भंडारा गोंदिया मतदार संघासाठी काँग्रेसचा उमेदवार कोण ? -नानाभाऊ पटोले स्पष्टचं म्हणाले . . . !
✍️भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
भंडारा : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. असे असताना अद्याप महाविकास आघाडीकडून या मतदारसंघांसाठी एकाही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने नाराजीनाट्य बघायला मिळत असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत २०१४ आणि २०१९ प्रमाणे नामुष्की ओढावून घ्यायची नाही, या इराद्याने काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. मात्र नाना पटोले स्वत: या निवडूक लढवण्यास फारसे उत्सुक नसल्याचे संकेत दिले आहे. यावर स्वत: नाना पटोले यांनी भाष्य करत मला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघापुरते मर्यादित करून अडकवून ठेवू नका, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
*काँग्रेसचा उमेदवार कोण ?*
नवी दिल्लीत येथे नुकतीच काँग्रेसच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांच्या नावांबाबत खल झाला. या बैठकीअंती महाराष्ट्रातील १३ उमेदवारांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली असून ही यादी आज येणे अपेक्षित आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. मात्र चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड चढाओढ लागली आहे. तर भंडारा-गोंदियासाठी स्वत: नाना पटोले फारसे इच्छुक नाहीये. भंडारा जिल्ह्यातील साकोलीत इथं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांशी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
*नाना पटोले निवडणूक लढण्यास फारसे इच्छुक नाहीत?*
यावेळी नाना पटोले यांनी कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं की, पक्षश्रेष्ठीकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करा आणि निवडून आणा. मला भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघापुरते मर्यादित करून अडकवून ठेवू नका, असंही ते यावेळी म्हणाल्याने पटोले हे काँग्रेसचे उमेदवार राहणार नसल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांनीच लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला असता यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, आपल्या भावना मी पक्षश्रेष्ठीकडे पोहचवतो, उद्या मला आदेश आल्यास मी त्याचे पालन करेलच. मात्र, एका मतदारसंघात अडकून पडण्या ऐवजी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात फिरून जास्त खासदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देखील नाना पाटोले म्हणाले. त्यामुळे आता काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांच्या उमेदवारी बाबत पक्ष नेमका काय निर्णय घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.