कोरपना कृउबा समितीत लाखोंचा भ्रष्टाचार
संचालक सुनील बावणे यांचा पत्रकार परिषदेत आरोप
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे मो. 99 23 35 89 70
कोरपना :- कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि सचिवांनी संगनमताने विविध साहित्य खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
येथील भ्रष्टाचाराची जिल्हा उपनिबंधकाडे तक्रार करण्यात आली. मात्र, जिल्हा उपनिबंधकही येथील भ्रष्टाचाराच्या चौकशीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सुनील बावणे यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीत बनावट बिल तयार करून सभापती आणि सचिवांनी लाखो रुपये हडपले आहे. अन्य साहित्य खरेदीतही त्यांनी लाखो रुपये हडपल्याचा आरोप बावणे यांनी केला आहे. कृउबासच्या मासिक सभेत संचालकांनी या
विषयावर चर्चा करून मासिक सभेची प्रत मागितली. परंतु, मासिक सभेची प्रत संचालकांना देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बावणे यांनी यावेळी केला आहे.
सभापती अशोक बावणे आणि सचिव कवडू देरकर यांनी चंद्रपुरातील एका व्यावसायिकाकडून सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले. मात्र, या कॅमेऱ्याची किंमत बाजारदरापेक्षा अधिक लावून रक्कम हडपली
आहे. हे बिल मंजूर करण्यात येऊ नये, अशी मागणी विरोधी संचालकांनी रेटून धरली. मात्र, याकडे कानाडोळा करून मनमर्जीने देयक पास करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधकांनी महिनाभरात या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी. अन्यथा चंद्रपुरातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संचालक सुनील बावणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.