अखेर ताडोबाचा राजा ‘वाघडोह’ वाघाचा मृत्यू!
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
चंद्रपूर,: – एकेकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची शान असलेला, सर्वात मोठा, पण वयोवृध्द झालेल्या ‘वाघडोह’चा अखेर 24 तासापूर्वी मृत्यू झाला. सोमवार, 23 मे रोजी सकाळी त्याचे शव आढळून आले. 17 वर्ष वय झालेल्या या वाघाने दोन दिवसापूर्वीच सिनाळा येथील गुराख्याला ठार केले होते. तेव्हापासून या वाघावर ताडोबाच्या अधिकार्यांचे लक्ष होते. वृद्धापकाळाने त्याची प्रकृती अस्वस्थ होती. अशातच त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. तो कुजण्याच्या अवस्थेत येत असून, दुपारपर्यंत शवविच्छेदन होणार असल्याचे वनाधिकार्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी या देखण्या वाघाचे अगदी रूक्ष रूप समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. हा वाघ वयस्क असल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणेही त्याला अवघड झाले होते. त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडले होते. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून त्याचा सतत वावर होता. दरम्यान, बकर्या चराईसाठी शनिवार, 21 मे रोजी सकाळच्या सुमारास गावाजवळील जंगल परिसरात गेलेल्या दशरथ पेंदोर (65, रा. सिनाळा) यांच्यावर या वाघाने हल्ला करून ठार केले होते. म्हातारा आणि अशक्त असलेला हा वाघडोह Waghadoh मानव आणि पाळीव जनावरांसाठी धोकादाय ठरत होता. त्यामुळे वनविभागावर ग्रामस्थांची तीव्र नाराजीही होती. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी करीत होते. शेवटी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा एक बलवान व देखणा असा व्याघ्रकाळ संपला.