“वर्गवारी, अनुसूचित जातीच्या आरक्षणाची.!”
का उठता बसता, काकरव करता ,
फायदा आरक्षणाचा कमाल,
बौद्धच घेता,
पण वस्तुस्थितीला, विसरून जाता,
गळ्यात मडकं अन पाठीला झाडू,
फकस्त आमच्याच होता.!
अपमान तो जपला मनी,
”गाव सोडा, शहराकडे चला “
आदेश बाबांचा, घेतला ध्यानी,
कामं महारकीची, ठोकरूनी
हलवली बिर्हाडं, गावातूनी.!
स्थिरावलो शहरादारी,
काढून पोटाला चिमटा भारी,
ठेवली नजर घारीपरी,
पोरांच्या शिक्षणावरी,
होऊन शिक्षित,
बसली मोठ मोठ्या पदांवरी.!
गेले सांगून बाबा,
देशातील समस्त, दिन दलितांना,
”जो शिक्षणरुपी वाघिणीचे दूध पितो, तो गुरगुरल्या शिवाय रहात नाही.”,
त्या गुरगुरण्याने,
घाम फुटला सत्ताधाऱ्यांना.!
योजिली क्लृप्ती भारी,
दिली फुस मागासवर्गीयांतरी,
दिली महामंडळे, एक ना अनेक,
भ्रष्टाचाराने केला बट्ट्याबोळ,
झाली तुरूंगवारी, करीत एक एक.!
न स्वस्थ्य बसले, सत्ताधारी,
बागुलबुवा दाखवून भारी,
सरसावले करण्या,
अ, ब, क, ड, ई अंतर्गत वर्गवारी,
करून ठेवली सोय,
एकमेकांच्या, बसायला उरी.!
असे विनवणी सगळ्यांशी,
नका खेटू एकमेकांशी,
टाळा मतभेद, विचारांती,
समजून घ्या, राजकारण,
”फोडा, झुंजवा अन राज्य करा.!
फोडा, झुंजवा अन राज्य करा.!!
फोडा, झुंजवा अन राज्य करा .!!!