राजकीय पक्ष हा सत्ताकांक्षी असतो. सत्ताकांक्षी असणे हा राजकीय पक्षाचा श्वास असतो. आजची सत्ता टिकवत भविष्यातील सत्ता मजबूत करणे हे धोरण असते.
अजित दुराफे
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई: बाळासाहेबांनी शिवसेना हा पक्ष स्थापन करताना तो एकचालकानुवर्ती असेल अश्याच पद्धतीने त्याची रचना केली होती. बाळासाहेबांचा करिष्मा आणि कौशल्य थोर असल्याने त्यांना ते साधले सुद्धा होते. तरीही त्यांना सुद्धा स्वतःच्या आयुष्यात एकदा राजीनामा देण्याचे नाटक करण्याची आणि त्यातून आपली ढिली झालेली खुंटी बळकट करण्याची वेळ आलीच होती.
घराणेशाहीने पक्ष चालवण्याचे काही फायदे असतात आणि काही तोटे असतात. पहिला फायदा तुमच्या नेतृत्वाला आव्हान निर्माण होण्याची शक्यता अत्यल्प असते. आणि असे आव्हान निर्माण होते आहे वाटले की त्या लोकांना पक्षातून हाकलून देऊन आपली पक्षावरील मांड मजबूत करता येते. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती असते निष्ठा फक्त पक्षप्रमुखाशी ठेवायची आहे. बाकी सगळे बकवास आहे. जो या पेक्षा भिन्न विचार करतो, भले तो पक्षाच्या कितीही हिताचा का असेना त्या विचारालाच बंड समजले जाते आणि अश्या व्यक्तीचा इलाज केला जातो.
अश्या पद्धतीचे तमाशे आपण कॉंग्रेस पक्षात होतांना वारंवार पाहिले आहेत. राहुल आणि प्रियांका यांच्या मर्यादांमुळे सोनिया प्रकृती साथ देत नसताना सुद्धा खुर्ची सोडत नाही. सोडू शकत नाही. कारण ज्याक्षणी तसे घडेल, कोन्ग्रेस मधील जुने जाणते पक्ष आपल्याला हवा तसा चालवू लागतील. यात कदाचित पक्षाचे भले होईल. पक्ष मजबूत होईल.. सत्तासोपान पण प्राप्त होईल. पण त्यावर गांधींचे नियंत्रण नसेल. मग माझे नियंत्रण नसेल तर काय फायदा ? पक्ष संकुचित होवो पण माझ्याच शब्दावर चालला पाहिजे. ही अक्षरशः हिटलर मानसिकता आहे.
अशी मानसिकता असलेल्या कंपन्या सुद्धा बुडतात. जे त्या त्या क्षेत्रातील ज्ञानी लोकांचे ऐकून काम करतात. त्यांचे नेतेपण कायम रहाते आणि कंपनी पण विस्तार पावते. बाळासाहेबांनी भले हिंदुत्व हे सत्ता सोपान मिळावा म्हणून धारण केलेली शाल म्हणून वापरले असेल. पण ही शाल शेवटपर्यंत त्यांच्या अंगावर होती आणि याच शालीकडे पहात शिवसेनेचा विस्तार झाला आहे. शिवसेनेत हजारांनी शिवसैनिक घडले आहेत. म्हणजे एखादा विचार आपण राजकीय सोय म्हणून स्वीकारतो आणि तोच आपली ओळख बनतो असा काहीसा हा प्रकार आहे. पण असेच घडले आहे. आणि याचा छुपा लाभ म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्यावसायिक व्यवहार या हिंदुत्वाच्या शालीआड सुरळीत सुरु पण राहिले आणि त्यावर आक्षेप घेण्याचे कुणाचे धाडस पण झाले नाही. एका प्रकारे हिंदुत्व ही शाल ठाकरे कुटुंबासाठी वैयक्तिक पातळीवर कवचकुंडल म्हणून काम करत राहिली. पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सुद्धा या विचारानेच प्रेरित राहिले. किंबहुना कट्टर हिंदुत्वाची आस असणारा प्रत्येक सामान्य माणूस हा भावनिक दृष्ट्या शिवसेनेशी अधिक संलग्न राहिला. भाजप त्याला त्या दृष्टीने नेहमीच परकी वाटली. भाजपाबद्दल आपलेपणा निर्माण करण्याचे कार्य सेक्युलर हिंदुसाठी अटलजी आणि हिंदुत्ववादी मंडळींसाठी मोदीजींनी केले आहे.
उद्धव ने सत्ता स्वीकारताना मारलेली थाप महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला पटली होती. हे सत्य आहे. सगळ्यांना वाटले होते कदाचित शहा यांनी शब्द दिला पण असेल. त्यामुळे उद्धव यांनी या पद्धतीने केलेला विश्वासघात सुद्धा लोकांनी पचवला.
परंतु एक मुख्यमंत्री म्हणून पूर्णपणे अकार्यक्षम, अननुभवी आणि मर्यादा असणारा व्यक्ती ज्यावेळी समोर आला, ते सुद्धा कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या वेळी, तेव्हा लोकांच्या विश्वासाला पहिला मोठा तडा गेला..
बर याच्या जोडीला राऊत यांचे बरळणे आणि उद्धव यांचे सुद्धा आत्ममग्न असे अर्थहीन भाष्य, लोकांच्या मनातून शिवसेनेला उतरवू लागले. पुढे कळस झाला तो राष्ट्रवादीने संपूर्ण निधी पळवणे आणि उद्धव यांनी पूर्ण सेक्युलर भूमिका स्वीकारणे याने.
आमदाराला त्याच्या मतदारसंघात काम दाखवावे लागते. निधी खर्च करावा लागतो तर तो पुन्हा निवडून येऊ शकतो. दुसरा भाग निवडणूक लढण्यासाठी जे लावलेले पैसे असतात ते पण परत मिळाले तर पुन्हा खर्च करणे शक्य असते. निधी पळवल्याने आमदारांना सत्तेचा आर्थिक लाभच प्राप्त होईना. आमदारांना यात भविष्यातील निवडणूक लढवणे अशक्य होणार आहे हे जाणवू लागले.
बाळासाहेबांनी आपल्या राजकीय करियर मध्ये कायमच केंद्रातील सत्ताधारी पक्षाला चुचकारत आपला पक्ष वाढवला होता. जनमानसाची भावना कायमच बोलून दाखवायची परंतु त्याच वेळेस केंद्रातील सत्ताधारी पक्षाला मर्यादेपलीकडे दुखवायचे नाही ही कसरत करत त्यांनी पक्ष वाढवला होता.
२०१९ ला मोदी म्हणजे माध्यान्हीचा सूर्य होते. अश्या वेळी त्यांना अत्यंत बालिश वागत आणि बोलत कायमच आव्हान देणे किंवा त्यांना शेलकी शिवीगाळ करणे हे उद्धव आणि संजय राऊत यांनी वारंवार केले. काही वेळा तर कोन्ग्रेस सुद्धा ज्या पातळीवर उतरणार नाही त्या पातळीवर उतरून त्यांनी हे वर्तन केले, वारंवार केले. थोडक्यात भविष्यात भाजपासह कोणतीही राजकीय तडजोड होणार नाही या दृष्टीने त्यांनी काळजी घेतली होती. हे करताना मुस्लिमांचे अफाट तुष्टीकरण म्हणजे उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी होती.
थोडक्यात समस्त निवडून आलेल्या आमदार आणि खासदार यांना या गोष्टीची जाणीव झाली होती की यांची धोरणे अशीच चालू राहिली तर आपल्याला मतदारसंघात मत मागणे सोडा, तोंड दाखवणे सुद्धा अशक्य होऊन बसणार आहे. आणि ज्याच्या बळावर हमखास निवडून येऊ अश्या मोदींची साथ सोडल्यावर आपल्याला राजकीय भवितव्यच उरत नाही. हे आमदारांना खासदारांना समजते पण राऊत आणि ठाकरे यांना समजले नाही. अजूनही समजले नाही.
त्यामुळे पक्षातील समस्त जनाधार असलेल्या मंडळींनी हे बंड पुकारले आहे. हे पक्ष म्हणून अस्तित्व टिकावे आणि आपली सत्ता टिकावी या साठी केलेले बंड आहे.
राजकीय पक्ष हा सत्ताकांक्षी असतो. सत्ताकांक्षी असणे हा राजकीय पक्षाचा श्वास असतो. आजची सत्ता टिकवत भविष्यातील सत्ता मजबूत करणे हे धोरण असते. उद्धव यांच्या सरकार ने आजची सत्ता केवळ स्वतः आणि कुटुंबांपुरती टिकवणे आणि उद्या पक्ष राष्ट्रवादीच्या वळचणीला नेऊन ठेवणे हे धोरण स्वीकारल्याने हे बारभाई कारस्थान झालेले आहे. इतिहासात नोंद आहे. बारभाई कारस्थान यशस्वी झाल्याची… हे कारस्थान सुद्धा यशस्वी होईल कारण यातून पक्ष वाचेल, सत्ता टिकेल परंतु पक्ष आणि सत्तेच्या भविष्यातील नाशाला कारणीभूत ठरणारे ठाकरे कुटुंबीय आणि संजय राउत यांच्या सारखे वाचाळ लोक कायमचे दूर केले जातील.
एकनाथ शिंदे नेते म्हणून उत्तम असतील, आनंद दिघेंचे शिष्य असतील परंतु त्यांच्याकडे करिष्मा नाही. त्यामुळे ते पक्षात सामुहिक नेतृत्व आणि सर्वांशी सल्लामसलत करून सत्ता राबवणे किंवा पक्ष धोरणे राबवणे हे धोरण स्वीकारतील. अर्थात शिवसेनेत लोकशाहीचा उदय होईल. घराणेशाही मरण पावेल.
देशातील समस्त घराणेशाही वाल्या राजकीय पक्षात असे घडले तर आपल्या देशातील संसदीय लोकशाही अधिक मजबूत होईल. त्या दृष्टीने सुद्धा हे बंड अत्यंत लाभप्रद सिद्ध होणार आहे.