माथेरान शार्लेट लेक ओव्हर फ्लो चा सुरक्षित धबधबा पर्यटकांसाठी बंद, स्थानिकांसह पर्यटकांची नाराजी…
✍🏻 श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान , शहर प्रतिनिधी
मो.8793831051
माथेरान :- सध्या पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे हिल स्टेशन असलेल्या माथेरान मध्ये विकेंडच्या दिवसात प्रचंड प्रमाणात गर्दी पाहाव्यास मिळत आहे. येथील महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळापैकी पर्यटनाचा प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या शार्लेट लेक तलावावरील ओव्हर फ्लो ने तयार झालेला कृत्रिम व सुरक्षित मानला जाणारा धबधबा हा येथील पावसाळी पर्यटनाचे खास आकर्षण आहे. मात्र काही दिवसांपासून या धबधब्याकडे जाण्याऱ्या मार्गांवर माथेरान नगरपरिषदेने तारेचे कुंपण करून पर्यटकांना मज्जाव केला आहे. परिणामी शार्लेट लेक तलावाच्या परिसरात ज्या ठिकाणी कोणतेही तारेचे कुंपण किंवा सुरक्षा रक्षकच तैनात नाही व जेथे पाण्याची खोली देखील जास्त आहे अशा ठिकाणी तलाव पात्रात सेल्फी,फोटो काढण्यासाठी मोठया प्रमाणात पर्यटक हमखास उतरताना दिसत आहे. यामुळे खास पावसाळी पर्यटनाचे आकर्षण व सुरक्षित मानला जाणाऱ्या शार्लेट लेक तलावाच्या ओव्हर फ्लो धबधब्यावर आनंद घेण्यासाठी दरवर्षी माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करण्यासाठी तारेचे कुंपण करून या ठिकाणी माथेरान संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या नावाने तलावात मगर असल्याचे खोटे सूचना फलक लावून येथील प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचे व पर्यटकांच्या सुरक्षेते बाबत फक्त दिखावा करत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. व त्याचा थेट परिणाम येथील पर्यटनासह स्थानिकांच्या व्यवसायावर होत असल्याने माथेरान नगरपरिषदेच्या या भोंगळ कारभाराबाबत स्थानिक व्यवसायिक तसेच पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून गेले कित्येक वर्षापासून पावसाळी पर्यटनात येथे येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण व येथील व्यवसायिकांचे आर्थिक स्तोत्र चालवणारा माथेरानचा हा सुरक्षित मानला जाणारा धबधबा पर्यटनासाठी त्वरित खुला करावा अशा मागणीला देखील आता जोर धरू लागला आहे.
————————————————————–
पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण म्हणून शार्लेट लेक तलावाच्या ओव्हर फ्लो कडे धबधबा म्हणून पाहिले जाते. गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी आम्ही व्यवसाय करतो येथे आलेले पर्यटक सुरक्षित व कमी पाण्यात धबधब्याचा आनंद घेत असतात. आणि पावसाळ्यात माथेरानला या धबधब्यासाठी पर्यटक मोठया संख्येने येत असतात. तरी प्रशासनाने सदर धबधबा पर्यटकांसाठी खुला करावा.
मंगेश शिंदे (स्थानिक व्यावसायिक )