डॉ. अरुण गवळी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया यंत्रणेचे उमाजी केळुसकर यांच्या हस्ते अनावरण

डॉ. अरुण गवळी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया
यंत्रणेचे उमाजी केळुसकर यांच्या हस्ते अनावरण

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग बायपास रोड, गोकुळ नगर चेंढरे येथील सुप्रसिद्ध डॉ. अरुण गवळी हॉस्पिटलमध्ये नवीन पिढीच्या डॉक्टरांसाठी अत्याधुनिक शस्त्रक्रिया यंत्रणा (Advanced Operation Machines) बसवण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण यंत्रणेचे अनावरण रविवारी (२२ जून) साहित्यिक आणि साप्ताहिक कोकणनामा संपादक उमाजी केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले, ज्यामुळे रुग्णांना आता जागतिक दर्जाची आरोग्यसेवा मिळणार आहे.
या अनावरण सोहळ्याप्रसंगी या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. अरुण गवळी, सुनीता अरुण गवळी, डॉ. गणेश अरुण गवळी, डॉ. अमृता गणेश गवळी, डॉ. अमित अरुण गवळी, सिस्टर संगीता पुरो, तन्वी मोकल, मनाली पाटील, दिव्या पाटील, मीनल पाटील, सागर माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गवळी हॉस्पिटलने आधुनिक वैद्यकीय सेवेमध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. बसवण्यात आलेल्या या अत्याधुनिक उपकरणांमुळे डॉक्टरांना अधिक अचूकता आणि कार्यक्षमतेने शस्त्रक्रिया करणे शक्य होईल, ज्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला खूप मोठा फायदा होणार आहे. उमाजी केळुसकर यांच्या हस्ते फीत कापून या यंत्रणेच्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
या नवीन आणि आधुनिक यंत्रणेमुळे ऑर्थोपेडिक, गायनॅकॉलॉजी, जनरल सर्जरी आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे (Endoscopy) करणे शक्य होणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, या तंत्रज्ञानामुळे कमीतकमी चिरफाड होते, ज्यामुळे रुग्णांना होणारी वेदना कमी होते आणि १-२ दिवसांत पेशंट बरा होऊन घरी पाठवता येतो. यामुळे रुग्णांना लवकर बरे होऊन आपल्या दैनंदिन जीवनात परत येण्यास मदत मिळेल.
यावेळी बोलताना साहित्यिक उमाजी केळुसकर यांनी डॉ. अरुण गवळी यांच्या कार्याचे कौतुक केले. “डॉ. अरुण गवळी हे गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात,” असे ते म्हणाले. “त्यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच जनसेवेचे व्रत उत्तम सांभाळले आहे. त्यांनी अशीच जनसेवा यापुढेही चालू ठेवावी,” अशी अपेक्षा व्यक्त करत, केळुसकर यांनी डॉ. गवळींना त्यांच्या या नवीन पर्वासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. डॉ. अरुण गवळी हॉस्पिटलचा हा प्रयत्न रुग्णसेवेत एक क्रांती घडवून आणणारा ठरेल आणि स्थानिक नागरिकांना अद्ययावत वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येईल.