जनसेवा विक्रम मिनीडोअर संघटना रस्त्यावर
खडडे भरो आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-अलिबाग-रोहा मार्गावरील वेलवली खानाव ते वावे रस्त्यावर पडलेल्या खड्डयांची दुरुस्ती करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन ठरले. त्यामुळे संतप्त झालेल्या जनसेवा मिनिडोअर संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 23) सकाळी खड्डे भरो आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विरोधात घोषणा देत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मिनिडोअर चालक-मालक यांनी श्रमदानातून खड्डयात माती, खडी, दगड टाकून खड्डे बुजवण्याचे काम केले.
वेलवली खानाव ते एचपीसीएल कंपनी प्रवेशद्वार, कुणे येथील महावितरण कंपनीचे सब स्टेशन ते उसर येथील सेंट्रल बँक तसेच वावे नाका येथे ठिकठिकाणी खड्डे पडले होते. या खड्डयांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. पावसाळ्यात या खड्ड्यातून वाहन चालविताना तारेवरची कसरत करण्याची वेळ चालकांवर आली होती. खड्डे पावसाच्या पाण्याने भरल्याने खड्डयांची खोली दिसून येत नव्हती. त्यामुळे वाहनांचे अपघात होण्याची भिती निर्माण झाली होती. खड्डे तात्काळ भरण्यात यावे अशी मागणी जनसेवा विक्रम मिनीडोअर संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणीकडे दुर्लक्ष केले. रस्त्याची डागडुजी करण्यास ही यंत्रणा उदासीन ठरली. त्यामुळे संतप्त झालेल्या मिनीडोअर चालक मालकांनी अखेर रस्त्यावर उतरून खड्डे भरो आंदोलन सोमवारी (दि. 23) सकाळी केले. सुरुवातीला नारळ वाढवून खड्डे भरण्यास सुरुवात केली. प्रत्येक चालकमालकांनी हातात घमेले फावडे घेऊन श्रमदानातून खड्डे बुजवण्याचे काम केले. त्यामुळे प्रवाशांसह चालकांना तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्डेमय रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी जनमाणसातून प्रतिक्रिया उमटली.