लांजी गावात अस्वच्छतेचे साम्राज्य तरी पुरस्काराची लालसा माजी सरपंच संतोष कोपुलवार

लांजी गावात अस्वच्छतेचे साम्राज्य तरी पुरस्काराची लालसा माजी सरपंच संतोष कोपुलवार

आदित्य खंदारे
शहर प्रतिनिधी माहुर

माहुर तालुक्यातील लांजी ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छतेची कुठलीही कामे न करता ती केल्याचे कागदोपत्री दाखवून व प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करून संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार लाटण्याचा प्रयत्न होत आहे. असा गंभीर आरोप तेथील माजी उपसरपंच संतोष कोपूलवार यांनी दि.21 जुलै रोजी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
माहूर तालुक्यातील लांजी ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता विषयक कुठलीही कामे झालेली नाहीत,निरीक्षणाकरिता समिती येणार असल्याची चाहूल लागताच देखाव्या पुरती एकदोन दिवस काही भागात नेटनेटकी स्वच्छता राखली जाते,असा उल्लेख संतोष कोपूलवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कावली यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.तसेच आजही लांजी गावात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असून उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही त्यात म्हटले आहे.सरपंच मारोती रेकूलवार हे पंचायत समिती प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून व शिलेबाजी लावून सर्व काही ठीक असल्याचा बडेजावपणा मिरवत आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. दि. ११ जुलै २०२५ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्या मार्गदर्शनात एकात्मिक बालविकास अधिकारी पत्तेवार, के. पी. देसाई व बी.ए. गोवंदे यांनी इतर गावांची पाहणी न करता केवळ लांजी याच गावाची पाहणी केली, त्याचे नेमके गूढ काय असा प्रश्न संतोष कोपूलवार यांनी आपल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.लांजी गावाच्या स्वच्छतेची वस्तुनिष्ठ चौकशी करून संत गाडगेबाबा अभियाना अंतर्गत ज्या ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात काम केले,त्याच ग्रामपंचायतीला पुरस्कार द्या,अशी विनंतीही कोपुलवार यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.