गणेशमूर्ती सोबत गौरीच्या मुखवट्यांचे काम अंतिम टप्प्यात
मुखवट्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी; सणासुदीत लाखोंची होतेय. उलाढाल
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- गणेश मूर्तींसोबत गौरीचे हि मुखवटे तयार होऊ लागले आहेत. या मुखवट्यानंही मोठ्या प्रमाणात मागणी असते. गणपतीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने आता गौरींचे मुखवटेही आकार घेऊ लागले आहेत. गणेश चतुर्थी नंतर तीन दिवसांनी म्हणजेच जेष्ठ नक्षत्रात गौरींचे पूजन केले जाते.
गणपती सोबत गौरींचे मुखवटे हि तयार होतात हे मुखवटे पीओपी आणि फायबर ह्या प्रकारचे असतात. या मुखवटे ना हि मोठी मागणी असते. लाखोंची उलाढाल यामधून होते.
गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते.गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. तर समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याचीही रित असते. तर काही जणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो.
ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. यादिवशी सवाष्ण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचीही पद्धत आहे. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात.
अलिबाग तालुका आणि त्यापुढे दक्षिणेस दक्षिण रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या भागात हा सुपे ओवसणे ही प्रथा आहे. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात. नारळ, पोफळ, भात, मीठ, भाजीपाला पिकविणारा कोकणचा भाग म्हणजे आगर. आगरात वरील समाजामध्ये लग्न झाले की नववधूकडील मंडळी या ओवशाची वाट पाहतात. नव्या सुपात चोळखण वगैरे पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी चोळी लेवून नववधू ते सूप डोक्यावर घेऊन गौरीचे पूजन झाले की गौरीजवळ जाऊन ते भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली अशाप्रकारे पाच वेळा करते याला सूप ओवसणे (ओवाळणे) म्हणतात. अशी ओवसलेली कमीत कमी पाच सुपे डोक्यावर घेऊन (पूर्वी अनवाणी) चालत, बरोबर कमीत कमी पाच सवाष्ण घेऊन ती सासरी जाते. सासरी यास सुपांचा ओवसा आला म्हणतात. हा आला ओवसा सासरी स्वीकारला जातो.
प्रतिक्रिया
गौरींचे मुखवटे हे दसऱ्या पासून करायला सुरवात करतो. मुंबई पुणे रत्नागिरी यासारख्या मोठ्या शहरातून आमचे मुखवटे जातात. मुखवटे हे पीओपी आणि फायबर या दोन्ही मध्येच तयार होतात. फारच थोडे जण हे मुखवटे करतात.या मुखवट्यांची किंमत १ हजार पासून ते ५ हजारापर्यंत असते. गणपती आणि गौरीचे मुखवटे तयार करण्यासाठी घरातीम मंडळींसह अनिस कामगार आहेत.
.
प्राजक्ता प्रथमेश म्हात्रे
महिला कारागीर
वाघ्रणअलिबाग