सभासदांचा विश्वासच हिच खरी ताकद – अध्यक्ष शेखर वागळे
यशोधन सहकारी पतसंस्थेला तब्बल ४४ लाखांचा नफा यशोधन सहकारी पतसंस्थेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- “हा नफा फक्त आकड्यांचा नाही, तर आपल्या एकतेचा विजय आहे,” अशा भावनिक शब्दांत यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शेखर वागळे यांनी सभासदांचे मनोबल वाढवले. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये संस्थेला तब्बल ४४ लाख ४५ हजारांचा निव्वळ नफा झाला असून, मागील शिल्लक धरून संस्थेकडे एकूण ४४ लाख ४९ हजार रुपये शिल्लक राहिल्याची माहिती अध्यक्षांनी दिली.
ठेवींच्या बाबतीतही संस्थेने मोठी झेप घेतली आहे. गतवर्षीच्या १२ कोटी ९ लाख रुपयांच्या तुलनेत यावर्षी ठेवी वाढून थेट १३ कोटी ६ लाखांवर पोहोचल्या आहेत. म्हणजेच तब्बल ९७ लाख रुपयांची वाढ नोंदली गेली आहे. “हा आकडा माझा नसून तो सभासदांच्या विश्वासाचा आहे,” असे वागळे यांनी गौरवोद्गार काढले.
भावनिक समारोपात त्यांनी म्हटले, “आपल्या छोट्या छोट्या ठेवी म्हणजे संस्थेच्या प्रगतीचे इंधन आहे, तर आपली एकता हीच खरी उर्जा आहे.”
दरम्यान, कार्यक्रमात संस्थेचे ऑडिटर संदीप गोठीवरेकर यांनी संस्थेचे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असून ठेवीदारांचे पैसे शंभर टक्के सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. तसेच कायदेशीर सल्लागार अॅड. किरण कोसमकर यांनीही संस्थेच्या प्रगतीविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी डिजिटल अरेस्ट, हनी ट्रॅप आणि सायबर क्राईम विषयक जनजागृती केली. नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात काम करणारे दादा क्लासेसचे दादा वारीसे व मारोती भगत यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पदाधिकारी, सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.