अदानी समूहाच्या गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सापडले ३००० किलो हेरॉईन.

१५ सप्टेंबरला गुजरातमधील अदानी समूहाकडून चालवल्या जाणाऱ्या मुंद्रा बंदरावरून  डीआरआय (महसूल गुप्तचर संचालनालय) ने केलेल्या कारवाईत ३००० किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत ७ करोड प्रति किलो याप्रमाणे जवळपास २१,००० करोड इतकी आहे.  भारतामध्ये आजवर जप्त करण्यात आलेला हा सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा आहे.

drugs trafficking in gujrat
अदानी समूहाच्या गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सापडले ३००० किलो हेरॉईन.

सिद्धांत

मुंबई दि. २४ सप्टेंबर २०२१: खरतर गुजरात एक ड्राय स्टेट आहे. म्हणजे तिथे दारूची खरेदी – विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. परंतु वाईट सवयींना, प्रवृत्तींना अनेक छुपी पाळंमुळं फुटलेली असतात, तसेच काहीसे गुजरात मध्ये होत आहे. दारूबंदी असली तरी गुजरातमध्ये अमली पदार्थांच्या स्मगलिंग आणि विक्रीच्या घटना गेल्या काही वर्षांपासून वाढतच आहेत. १५ सप्टेंबरला गुजरातमधील अदानी समूहाकडून चालवल्या जाणाऱ्या मुंद्रा बंदरावरून डीआरआय (महसूल गुप्तचर संचालनालय) ने केलेल्या कारवाईत ३००० किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत ७ करोड प्रति किलो याप्रमाणे जवळपास २१,००० करोड इतकी आहे. भारतामध्ये आजवर जप्त करण्यात आलेला हा सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा आहे.

अदानी समूहाच्या गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सापडले ३००० किलो हेरॉईन.
मुंद्रा बंदरावरून अमली पदार्थाची स्मगलिंग होणार असल्याची टीप डीआरआयला १४ सप्टेंबरला मिळाली होती. त्यानुसार आंध्र प्रदेशातील आशी ट्रेडिंग कंपनीच्या इराणमधील बदर अब्बास बंदरावरून आलेल्या दोन कंटेनरची तपासणी करण्यात आली. अफगाणिस्तानच्या कंधार येथील हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने हे कंटेनर निर्यात केलं होतं आणि त्यात ‘टॅल्कम पावडर’ असल्याच रजिस्टर केलं होत. परंतु तपासणीअंती त्यामधल्या एक कंटेनर मध्ये २००० किलो आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये ९८९ किलो हेरॉईन आढळून आले. कस्टम अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी हे ड्रग टॅल्कम पावडर बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल,टॅल्कम पावडर यांच्यासोबत २० पिशव्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. जप्त झालेल्या या अमली पदार्थचे प्रमाण इतके जास्त होते कि खास पाचारण केलेल्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांना ते शोधण्यास तब्बल चार दिवस लागले.
यासदंर्भात आशी ट्रेडिंग कंपनीच्या मालक सुधाकर आणि दुर्गा पूर्ण वैशाली या जोडप्याला अटक करण्यात आली असून प्राथमिक माहितीनुसार अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई , मांडवी, गांधीधाम या ठिकाणी तपासकार्य सुरु करण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर संशयाची सुई मुद्रा बंदर चालवत असलेल्या अदानी समूहाकडे सुद्धा वळली आहे. अदानी समूहाने निवेदन जाहीर करत म्हटले आहे कि, अदानी समूहाकडून फक्त मुंद्रा बंदराचे दैनंदिन कामकाज आणि व्यवस्थापन सांभाळले जाते. आयात करण्यात आलेल्या मालाची तपासणी करण्याची आम्हाला परवानगी नसून ते काम सरकारी अधिकाऱ्यांचे असते. त्यामुळे स्मगलिंग प्रकरणात आम्हाला गुंतवणे लोकांनी थांबवावे.

परंतु आधीच सरकारी मालमत्तांच्या खासगीकरण प्रकरणामध्ये लोकांचा रोष ओढवून घेणाऱ्या अदानी समुहाचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजप सरकारवर टीका करताना एक महत्त्वाचे विधान करत म्हटले होते कि, गेल्या काही वर्षांपासून गुजरातचा समुद्रकिनारा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण मधून भारतामध्ये अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा ‘फेव्हरिट मार्ग’ बनला आहे.

क्षणभर राजकारण बाजूला ठेवून ह्या विधानाचा विचार करणं गरजेचं आहे. गुजरातचा समुद्रकिनारा आणि त्यावरील बंदरे अमली पदार्थाच्या तस्करीसाठी नंदनवन बनत आहेत का?

गुजरातचा समुद्रकिनारा आणि त्यावरील बंदरे अमली पदार्थाच्या तस्करीसाठी नंदनवन बनत आहेत का?
गुजरात राज्याला १६०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून त्यावर ५० मोठी बंदरे असून अनेक लहान मोठ्या

अंमली पदार्थ तस्करीचे मार्ग.

जेट्ट्या आहेत. प्राचीन काळापासून या बंदरावरून आखाती आणि यूरोपीय देशांबरोबर भारतीय व्यापाऱ्यांचा व्यापार चालत असेल. पण सध्या येथील वाळवंटी प्रदेशातील अनेक लहान-मोठ्या जेट्या ओसाड पडल्या आहेत. त्याचा फायदा अफगाणिस्तान, इराण मधील अंमली पदार्थ भारतात आणणाऱ्या तस्करांनी घेतला आहे. जगातील ८०% हेरॉईनच उत्पादन अफगाणिस्तानमधे केले जात. आजूबाजूच्या देशातील राजकीय अव्यवस्था, दुर्गम प्रदेशांचा फायदा घेत तिथून ते इराण आणि पाकिस्तानच्या बंदरांवर आणलं जात. पुढे कधी आयात मालाच्या कंटेनरमधून तर कधी मच्छीमारांच्या बोटींमधून गुजरातच्या लहान-मोठ्या बंदरांवर आणून पुढे भारतभर वितरित केले जाते.

गुजरातमध्ये घडलेल्या अंमली पदार्था तस्करीच्या घटना
सप्टेंबर २०२१: भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत सात इराणी मच्छीमारांची एक बोट पकडली होती. तपासणीअंती त्या बोटीमध्ये १५० करोड किमंतीचे ३५ किलो हेरॉईन सापडले होते.
एप्रिल २०२१: १५० कोटी किमतीच्या अंमली पदार्थांची भारतात तस्करी करताना एक पाकिस्तानी बोट पकडली गेली. यावेळी आठ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली होती.
जानेवारी २०२१: पाच पाकिस्तानी नागरिकांना गुजरात समुद्रकिनाऱ्यावरून १७५ कोटी रुपयांचे अमली पदार्थांची तस्करी करताना पकडले गेले होते.
मार्च २०१९: भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पथकाने १०० किलो हेरॉईन भारतात तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ इराणी नागरिकांना गुजरात जवळच्या समुद्रामध्येच अडवून अटक केली होती.
ऑगस्ट २०१७: गुजरातच्या पोरबंदर समुद्र किनाऱ्यावर आलेल्या एमव्ही हेनरी या जहाजावरुन ३५०० कोटी किमतीचे १५०० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्यात जहाजाचा कॅप्टन सुप्रित तिवारी आणि ड्रग डीलर विशाल यादव याना अटक करण्यात आली होती.

मुंद्रा पोर्ट, गुजरात

उडता पंजाब. उडता महाराष्ट्र…उडता गुजरात???
गेल्या वर्षी गुजरात पोलिसांमार्फत अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर आळा घालण्यासाठी ५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान खास मोहीम राबवण्यात आली होती. या दरम्यान राज्यातल्या मुख्य शहरातील नागरिकांकडून ४.३९ कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तसेच ७९ जणांना अटक करण्यात आली होती. राज्यातल्या शहरांमधील पान दुकानांवर अंमली पदार्थ चिनी, पांढरी साखर, व्हाईटनर या सांकेतिक नावाने मागितल्यास सहज उपलब्ध होत असल्याचं या काळात निदर्शनास आले होते.
निवडणुकांच्या वेळी तरुणाईला आकर्षित करण्यासाठी अंमली पदार्थांचा वापर पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणावर होत असे. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी मात्र गुजरातने या बाबतीत पंजाबला मागे टाकले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशभरातून १२०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यापैकी सर्वात जास्त ५२५ कोटीचे गुजरात मधून तर २१५ कोटीचे अंमली पदार्थ पंजाब मधून जप्त करण्यात आले होते.
महात्मा गांधींच्या स्मरणार्थ दारूबंदी चे कडक कायदे करणाऱ्या गुजरात राज्यातील अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीची ही आकडेवारी फारच निराशाजनक आणि भविष्यात येणाऱ्या मोठ्या धोक्याचा इशारा देणारी आहे.

दोषी कोण आहे?….प्रश्न विचारणं गरजेचे आहे.
मुंद्रा बंदरावर भारतातील सर्वात मोठा अंमली पदार्थांचा साठा जप्त झाल्यानंतर भारतीय तटरक्षक दल, सरकारी आणि अदानी सारख्या खासगी कंपन्याना चालवायला दिलेल्या बंदरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ह्या घटनेशी संबंधित लोकांची, कंपन्यांची, उद्योगपतींची कसून चौकशी होणार आहे का? राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या प्रमुखाची अजून नेमणूक का करण्यात आलेली नाही? यांसारखे प्रश्न जनता विचारायला लागली आहे. प्रश्न विचाराने गरजेचे आहे. उत्तराची अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे, आणि उत्तर मिळाल्यास त्याचं योग्य विश्लेषण करणे गरजेचे आहे. दुर्देवाने जर उत्तर मिळाले नाही तर तरुणाईने भरलेल्या भारताला फार भयानक प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे. चिमूटभर हेरॉईन आणि कोकेन भारतीय तरुणाईच्या धडधाकट शरीराला पोखरून काढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here