हरितालिकेच्या दिवशी एकीच्या गालात हसू तर दुसरीच्या डोळ्यात अश्रू…!

60
haritalika festival maharashtra

हरितालिकेच्या दिवशी एकीच्या गालात हसू तर दुसरीच्या डोळ्यात अश्रू…!

haritalika festival maharashtra

     हरितालिका तृतीया सणा निमित्त सर्व माता,भगिनींना हार्दिक शुभेच्छा महिला, कोणतीही असो शेवटी ती एक महिलाच असते तिच्याच माया,ममता,स्नेह, जिव्हाळा, आपुलकी असते सोबतच ती कलागुणांची खाण असते स्त्री जगातील सर्वात उंच शिखर आहे आणि आज तिची कीर्ती साऱ्या जगभर पसरत आहे. पण, आजच्या दिवशी म्हणजेच हरितालिका तृतीया सणानिमित्त सुहासिनी महिला हरितालिका मातेचा व्रत करतात व दोन दिवस आपल्या सख्यांसोबत हसत,खेळत सण साजरा करतात हे,सर्व ठीक आहे पण ह्याच समाजात अशा काही महिला आहेत की, त्यांनाही काही भावना असतात पण,परिस्थितीमुळे त्या कोणाच्याही दृष्टीत पडत नाही त्यामुळे आजही या विज्ञान युगात सुद्धा त्यांना जुन्याच रितीरिवाजाप्रमाणे वागणुक दिल्या जाते त्या महिला म्हणजेच विधवा महिला होत. आजच्या दिवशी एका महिलेच्या गालात हसू तर दुसऱ्या महिलेच्या डोळ्यात अश्रू बघायला मिळत असते अशा प्रसंगी आपण कोणाला दोष द्यावे…? परिस्थितीला की,एक महिला दुसऱ्या महिलांसोबत करत असलेल्या भेदभावाला. …? हा एक भारी मोठा प्रश्न आहे तेवढीच शोकांतिका सुद्धा आहे. जो,माणूस या पृथ्वीतलावर जन्म घेते त्याला एक, ना एक दिवस हे जग सोडून जावेच लागते कारण हा निसर्गाचा नियमच आहे आणि तो अटळ सत्य आहे पण,एखाद्या महिलेचा पती जेव्हा मरण पावते तेथे त्या निष्पाप पत्नीचा काय दोष .? ज्यावेळी तिचा पती जिवंत असते त्यावेळी तिला प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले जाते ,ती नेहमीच आनंदी असते प्रत्येक सण साजरे करत असते पण,एकदा का तिच्या पतीचा मृत्यू झाला की, मात्र समाजातील तेच लोक तिच्याकडे नको त्या दृष्टीने बघायला सुरुवात करतात मग तिने जगावे तरी कसे. ..? तिला जगण्याचा अधिकार नाही का…? की,तिने कुठे सहभागी होऊच नये असले नियम निसर्गाने बणवले नसावे मग बणवले तरी कोणी…? निसर्गाचे तर सर्वच लेकरे असतात तो,कोणालाही भेदभाव करत नाही पण, आजही बऱ्याच भागामध्ये असो, किंवा शहरात सुध्दा विधवा महिलेकडे वेगळ्याच दृष्टीने बघितले जाते हे वास्तव सत्य नाकारता येत नाही.

         आजच्या या विज्ञान युगातील सुशिक्षित महिला जर विधवा महिलेच्या विषयी ,अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन जर…भेदभाव करत असतील तर बघून हरितालिका मातेला सुद्धा दु:ख होईल कारण, विधवा असलेली महिला सुद्धा तिचीच लेक आहे या विषयी मात्र विचार करायला कोणाकडेही वेळ नाही. जर अशीच भेदभाव करण्याची भावना असेल तर त्यापेक्षा विधवा महिलाच हि एका अर्थाने योग्य आहे कारण ती, पतीच्या मृत्यू नंतर विधवा होते पण,विचाराने ती कधीच विधवा होत नाही म्हणून ती, आजही ह्या समाजातील लोकांकडून होत असलेला अन्याय सहन करून जगून दाखवते तीच विधवा महिला अभिमानाचे दुसरे नाव आहे पण,हे सर्वांना कळते मात्र वळत नाही त्यामुळेच तिला कोणीही शुभ प्रसंगी आपल्या घरी आमंत्रित करत नाही व कोणत्याही धार्मिक वस्तूंना हात लावू देत नाही असे अनेक उदा. अनेकदा बघायला मिळत असतात. आजच्या दिवशी विधवा महिलेच्या डोळ्यात अश्रू असतात पण,ती कोणालाही दाखवत नाही कारण ते वाहणारे अश्रू ती लपवत असते व आपले जुने दिवस आठवून क्षणभर त्याच आठवणीत रमत असते पण,ती कोणालाही सांगू शकत नाही की,तिच्या पतीचे योगदान या देशासाठी किती श्रेष्ठ असतात तो,वीर सैनिक सीमेवर राहून लढा देताना शहीद होते त्याच्यामुळेच सर्व लोक सुखाने दोन घास खावून रात्रीची झोप घेऊ शकतात पण, आज त्याच्याच धाडसी पत्नीला समाजात भेदभाव करतात हे कितपत योग्य. ..? म्हणुन ती म्हणते या पाषाणमय दुनियेत माझ्या भावनांची कोणीही कदर करणार नाही. 

       ‌ या समाजात असणाऱ्या सुशिक्षित सुहासिनी महिलांनी हरितालिकेचा सण उत्साहाने साजरा करावे पण, एका महिलेच्या भावनांची कदर करून तिला सन्मान मिळवून देण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करायला पाहिजे. अशा पवित्र सणाच्या दिवशी तिलाही आपल्या घरी बोलावून हळदकुंकू लावून तिच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आपुलकीच्या नात्याने एक महिला होण्याच्या नात्याने प्रयत्न करावे तिला सहभागी करून घ्यावे बघा! जर असं झालं तर अनेक विधवा महिला आपले दु:ख विसरून पुन्हा एकदा नव्याने जगायला लागतील त्यांना विधवा असण्याची जाणीव सुद्धा होणार नाही पण,हे करण्यासाठी प्रत्येक महिलांमध्ये माणुसकी, स्नेह, जिव्हाळा, आपुलकी असणे आवश्यक आहे. कारण आजच्या या युगात प्रत्येक महिला सक्षम असणे गरजेचे आहे एक महिला दुसऱ्या महिलेचे दु:ख समजू शकते. आजच्या सध्याच्या घडीला बघितले तर कोणतीही महिला सुरक्षित दिसत नाही म्हणून एका महिलेने दुसऱ्या महिलेसोबत भेदभाव न करता तिला साथ दिली पाहिजे जेणेकरून तिला जगण्यासाठी आधार मिळेल व ताठ मानेने जगू शकेल

– सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली