पुढील हंगामासाठी सोयाबीनचे घरगुती बियाणे राखून ठेवा !

58

पुढील हंगामासाठी सोयाबीनचे घरगुती बियाणे राखून ठेवा !

कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

 

विनायक सुर्वे प्रतिनिधी

वाशिम :- जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस सुरु झाल्याने सोयाबीन पीक भिजले व वेळेत पिकाची मळणी होवू शकली नाही. काही पीक शेतात काढणी अभावी शेतात उभे होते, तर कापणी करण्यात आलेले सोयाबीन मळणी अभावी शेतात उचं जागेवर सुड्याच्या स्वरुपात झाकून ठेवलेले आहे. या सर्व बाबींवरून पुढील खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे राखून ठेवण्यात काही अंशी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी काढणी व मळणी पावसापूर्वी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे वाण पुढील हंगामासाठी राखून ठेवण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, याबाबत कृषि विभागाने स्थानिक वृत्तपत्रांमधून याबाबत शेतकऱ्यांना सूचना दिल्याने लवकर येणाऱ्या वाणाची शेतकऱ्यांनी काढणी व मळणी पावसापूर्वी केली आहे. या सोयाबीन बियाणाची प्रत चांगली आहे. काढणीच्यावेळी सोयाबीन मधील आर्द्रता १४ ते १७ टक्के पर्यंत असते, असे बियाणे हलक्या उन्हात सुकवून आर्द्रता ९ ते १२ टक्केपर्यंत आणावी. स्पायरल चाळणीमधून बियाणाची चाळणी करून घ्यावी. बियाणास बुरशीनाशक लावून कोरड्या हवेशीर जागेत गणी बॅगमध्ये ३० ते ४० किलोचे पॅकींग करून लाकडी फळ्यावर जमीनीपासून १० ते १५ से.मी. उंचीवर एकावर एक अशी पाचपर्यंत थप्पी लाऊन ठेवावी.

बियाण्याकरिता वापर करावयाच्या सोयाबीनची कमीत कमी आदळ-आपट होईल, याची काळजी घ्यावी. सोयाबीनची साठवणूक करतांना रासायनिक खताचा संपर्क येणार नाही, याची काळजी घेऊन वेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. साठवणुकीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. ७० टक्के पेक्षा अधिक उगवण क्षमता असल्यास, असे बियाणे साठवणूक करुन ठेवावे. सद्यास्थितीत सोयाबीनचे बाजारातील विक्रीचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्री करण्याकडे कल आहे. परंतु, आता विक्रीची घाई केल्यास पुढील हंगामाकरिता हेच सोयाबीन ७५०० ते ८००० रुपये दराने बियाणे म्हणून खरेदी करावे लागेल. त्यामुळे आजच खबरदारी घेतल्यास शेतकऱ्याच्या निविष्ठावरील प्रति क्विंटल रुपये ३५०० ते ४००० ची बचत होणार आहे.

साठवणूक केलेल्या बियाण्याची पेरणीपुर्व घरगुती पध्दकतीने दर तीन महिन्याने उगवण क्षमता तपासावी, असे घरगुती पध्दतीने तयार करुन ठेवलेल्या बियाण्याने स्वत:च्या शेतात खरीप हंगाम २०२१ पेरणीकरिता वापरावे व जास्तीचे बियाणे गावातील इतर शेतकऱ्यांना, इतर नातेवाईकांना विक्री करावी, जेणेकरुन पुढील खरीप हंगामकरिता बियाणे टंचाई भासणार नाही, सोयाबीन बियाणे उगवणीच्यान तक्रारी सुद्धा येणार नाहीत. शेतकऱ्यांचा निविष्ठावर होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल, गावातील पैसा गावाबाहेर न जाता तो गावातच राहील. याकरिता ज्या शेतकर्यांकडे पावसापुर्वी काढणी, मळणी करून ठेवलेले सोयाबीन असेल, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. एम. तोटावार यांनी केले आहे.