चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवस मद्यविक्री बंद
• मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान खबरदारी म्हणून 18, 19, 20 आणि 23 नोव्हेंबर रोजी मद्यविक्री बंद
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 23 ऑक्टोंबर
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत चंद्रपूर जिल्हयातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या चार दिवस बंद राहणार आहेत. 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजतापासून 19 व 20 नोव्हेंबरचा संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीचा दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या सर्व जागांकरीता बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच मतमोजणी शनिवार, 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 135 (सी) च्या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र देशी दारु नियम 1973 नियम 26(1)(सी) (1) महाराष्ट्र विदेशी मद्य (सेल ऑन कॅश, रजिस्टर ऑफ सेल्स इ.) नियम 1969 मधील नियम 9 ए (2) (सी )(1) तसेच विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम 1952 चे नियम 5(10) (बी) (सी) (1) व महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदणे) नियम 5 (अ) (2) मधील तरतुदीनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणुक कालावधीत चंद्रपूर जिल्हयातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या नमुना (सीएल-2, सीएल-3, सीएल/ एफएल/टिओडी-3 एफएल-1, एफएल-2 एफएल-3 एफएल-4, एफएल/बीआर-2, टिडी-1 (ताडी) इत्यादि सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या खालीलप्रमाणे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
नमुद कालावधीत या ओदशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये कडक कारवाई करण्यांत येईल, तसेच ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती निलंबीत अथवा रद्द करण्यात येईल, त्यांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद आहे.