राज्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने शेतामध्ये विष पिऊन केली आत्महत्या,  व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा  दाखल

62

राज्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने शेतामध्ये विष पिऊन केली आत्महत्या,  व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा  दाखल

संत्राविक्रीच्या व्यवहारामध्ये दोन व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याने. अंजनगाव पोलिस ठाण्यात 18 डिसेंबर रोजी गेले असता त्याठिकाणी तक्रारकर्त्याला बीट जमादार व ठाणेदार यांनी मारहाण केल्याचा आरोप अशोक भुयार यांनी मृत्यूपूर्व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून ठेवलेल्या चिट्ठीत केला आहे.

अमरावती:- अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील धनेगाव येथील शेतकऱ्याची संत्राविक्रीच्या प्रकरणात फसवणूक झाली. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने न्याय मिळण्याकरिता अखेरची चिठ्ठी लिहून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यामुळे अंजनगावसुर्जी तालुक्‍यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तालुक्‍यातील धनेगाव येथील शेतकरी अशोक पांडुरंग भुयार वय 55 यांनी धनेगाव येथील आपल्या शेतातील संत्र्याचा बहार अंजनगावसुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकला होता. मात्र श्री. भुयार यांना सदर व्यापाऱ्यांनी शेतामध्ये संत्राविक्रीचे पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने स्वाक्षरी घेऊन मारहाण केली, असा आरोप आहे.

त्याबाबतची तक्रार देण्यास धनेगाव येथील पोलिस पाटील व शेतकरी अशोक भुयार 18 डिसेंबर रोजी अंजनगाव पोलिस ठाण्यात गेले असता त्याठिकाणी तक्रारकर्त्याला बीट जमादार व ठाणेदार यांनी मारहाण केल्याचा आरोप अशोक भुयार यांनी मृत्यूपूर्व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून ठेवलेल्या चिट्ठीत केला आहे. त्यांनी मंगळवारी  तालुक्‍यातील बोराळा गणपती मंदिराच्या परिसरातील एका शेतामध्ये विष पिऊन आत्महत्या केली.

सदर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच शेकडो नागरिक अंजनगाव पोलिस ठाण्यात जमले होते. हे प्रकरण संत्रा व्यापाऱ्याने पैसे न दिल्याने घडल्याचा चिठ्ठीमध्ये उल्लेख आहे. दरम्यान, ठाणेदार व बीट जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त जमावाने केली. अपर पोलिस अधीक्षक श्‍याम घुगे हे अंजनगाव पोलिस ठाण्यात तळ ठोकून आहेत. त्यांच्या समोरच हा प्रकार घडून आल्याने पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून एक पोलिस कर्मचारी संबंधित शेतकऱ्याला मारहाण करताना दिसून आले.

त्यामुळे गावकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. आलेल्या तक्रारकर्त्यालाच पोलिसांनी मारहाण केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी चीड निर्माण झाली होती. संत्राविक्रीच्या व्यवहारामध्ये दोन व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध तसेच बीट जमादाराविरुद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. मृत शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने चिठ्ठी लिहिल्याने या संपूर्ण प्रकरणाकडे बच्चू कडू काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मृत शेतकऱ्याचा मुलगा गौरव अशोक भुयार यांनी अंजनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव, संत्रा व्यापारी शेख अमीन व शेख गफूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी  मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे अपर पोलिस अधीक्षक श्‍याम घुगे यांनी सांगितले.