विद्यार्थ्यांनो विज्ञानाच्या प्रयोगशीलतेतून नव्या संधींचा शोध घ्या – आ. किशोर जोरगेवार
📍जिल्हा परिषदेच्या वतीने 52 व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 23 डिसेंबर
विज्ञान ही केवळ एक विषयवस्तू नसून ती विचार करण्याची एक पद्धत आहे. विज्ञान आपल्याला प्रश्न विचारायला शिकवते आणि उत्तरे शोधायला प्रेरित करते. आजच्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प, संशोधन आणि प्रयोग पाहून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशा वाटते. आपल्या कल्पकतेतून समाजातील समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करत नव्या संधींचा शोध घ्या असे आव्हाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पंचायत समिती चंद्रपूर यांच्या वतीने 52 व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-2025 चे आयोजन न्यू इंडिया कॉन्व्हेंट येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, युवा जागृत क्रीडा मंडळ व ज्ञान प्रसारक मंडळ चंद्रपूरचे आशिष धिर, पंचायत समिती चंद्रपूरचे गटशिक्षाधिकारी निवास कांबळे, गटविकास अधिकारी संगीता भांगडे, संजय सिंग आणि न्यू इंडिया कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका वैशाली जनेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा योग्य वापर हा आजच्या काळाची गरज आहे. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
सरकार देखील विज्ञान शिक्षणासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देत आहे. शाळांमध्ये प्रयोगशाळा, विज्ञान केंद्रे आणि संशोधन उपक्रमांना चालना दिली जात आहे. यासोबतच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर मेहनत महत्त्वाची आहे. अपयश आले तरी त्याकडून शिकण्याची तयारी ठेवा. मोठे वैज्ञानिक आणि संशोधक अपयशांमधूनच मोठे शोध लावू शकले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रयोग हा यशाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रयोगांची पाहणी केली. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.