निधीअभावी रखडले डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्र

43
निधीअभावी रखडले डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्र

निधीअभावी रखडले डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्र

निधीअभावी रखडले डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्र

किहीम येथे दोन वर्षांपासून केंद्रांचे काम सुरू, आतापर्यंत 60 टक्केच कामे पूर्ण

रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: प्रादेशिक पर्यटन विकासाच्या योजनांबाबत शासनाने आखडता हात घेतला आहे. त्याच्या फटका रायगड जिल्ह्यातील अनेक योजनांना बसला आहे. अलिबाग तालुक्यातील किहीम येथे प्रादेशिक पर्यटन विकासाच्या योजनेअंतर्गत डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्रांचे काम तीन वर्षापूर्वी सुरु झाले आहे. आतापर्यंत या केंद्राचे 60 टक्केच काम पूर्ण झाले आहे. पर्यावरण अभ्यासक, पक्षी निरीक्षक आणि पर्यटक यांच्या दृष्टीने महत्वाच्या या केंद्राचे काम सध्या रखडले आहे. सुमारे 1 कोटीच्या या प्रकल्पाला अद्यापपर्यंत 50 टक्केच निधी आला आहे. त्यामुळे डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्राचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल जनतेच्या जाहीरनाम्यातून विचारला जात आहे.

मागील सरकारने मोठा गाजावाजा करून अलिबाग तालुक्यातील किहीम येथे पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास व पर्यावरण अभ्यास केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तीन वर्षांपूर्वी कामाला सुरुवातही झाली. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून हे काम करण्यात येत आहे. ६० टक्के बांधकाम झाल्यानंतर अडीच वर्षांपूर्वी सत्तापालट झाल्याने केंद्राचे काम बंद पडले ते अद्याप सुरूच झालेले नाही. पर्यटन विभागामार्फत अलिबाग तालुक्यातील किहीम येथे पक्षी अभ्यासक सलीम अली यांच्या नावाने पक्षी अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाल्याबरोबर केंद्राचे कामही सुरू झाले होते; मात्र त्यानंतर सत्तांतर झाले आणि काम रखडले. केंद्रामुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांना करता येणार आहे. एक पर्यटन क्षेत्र म्हणून एक वेगळी ओळख केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे या जागेत २०२२ पासून केंद्राचे काम सुरू केल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
रायगड जिल्हा परिषद व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किहीम येथे डॉ. सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास केंद्र उभे केले जाणार आहे. किहीम हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. हजारो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी येतात. पक्षी अभ्यास केंद्रातून किहीममध्ये आणखी पर्यटनाला चालना मिळणार आहे. शाळांच्या अनेक सहली जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेर जातात. हे अभ्यास केंद्र शाळांच्या सहलींसाठी वरदान ठरणार आहे.
पक्ष्यांबद्दल आकर्षण असलेल्या पक्षीप्रेमींबरोबर पर्यटनवाढीसाठी किहीम येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सलीम अली यांच्या नावाचे पक्षी सेंटर व अभ्यास केंद्र रायगड जिल्हा परिषद व वन विभागामार्फत उभे केले जाणार आहे. यासाठी किहीम गावातील जिल्हा परिषदेची शाळा २००७ पासून बंद आहे. शाळेच्या दोन इमारती असून सात वर्गखोल्या आहेत. त्यापैकी तीन वर्गखोल्या सुस्थितीत असून चार वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. शाळेची जागा अंदाजे ३० गुंठे क्षेत्रामध्ये असून या ठिकाणी प्रकल्प सुरू केला जाणार आहे.

चाैकट-
पक्षी केंद्राची उद्दिष्टे
पर्यटन वाढीला अधिक चालना देणे, वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी किहीम येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पक्षी अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. येथे त्यांनी भारतातील पक्ष्यांचा वावर, त्यांच्या सवयी, विविध प्रजाती, त्यांचे वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. याबरोबरच स्थलांतरित पक्ष्यांचाही अभ्यास केला जाणार आहे.

चाैकट-
कोण आहेत डॉ. सलीम अली?
डॉ. सलीम अली यांनी अलिबाग तालुक्यातील किहीम या ठिकाणी मुक्कामी असताना, सुगरण पक्ष्याचे अतिशय बारकाईने अभ्यास केला होता. त्यावर त्यांनी बीएनएचएसच्या जर्नलमध्ये प्रदीर्घ शोध निबंध लिहिला होता. हा निबंध त्यांना पक्षी शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यास मोलाचा ठरला. त्यांच्यामुळे भारतात हौशी पक्षी निरीक्षक बनण्याची परंपरा सुरू झाली आहे. वेगवेगळ्या पक्षी अभयारण्यांना भेटी देण्याची क्रेझ वाढत आहे. आजही हजारो पर्यटक किहीम येथे पक्षी निरीक्षणासाठी येतात.

 

चाैकट-
असे असेल संशोधन केंद्र
पक्षी केंद्रात सलीम अली यांच्याविषयी माहिती असणारे केंद्र बांधले जाणार आहे. सलीम अली यांनी पक्ष्यांविषयी लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचे ग्रंथालय, देशातील वेगवेगळ्या जातीच्या, तसेच कोकणातील वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती पर्यटक व स्थानिकांना मिळावी, यासाठी डिजिटल माहिती केंद्र, पक्ष्यांविषयी असलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांसाठी विक्री, हे सर्व डिजिटल स्वरूपाचे केंद्रात उपलबध असेल. अभ्यास केंद्राचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी पक्षी अभ्यासक आणि पर्यावरणवाद्यांकडून केली जात आहे.

इमारतीचे 60 टक्के काम पूर्ण
पर्यटनाला चालना देणे, वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी किहीममधील जिल्हा परिषदेच्या शाळेत पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन जानेवारी २०२२ मध्ये करण्यात आले. यासाठी रायगडच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला होता. मुख्य इमारत, उद्यान, तिकीट घर यासह कंपाउंड वॉलसाठी सुमारे १ कोटी १९ लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने 60 टक्के काम पूर्ण केले असून अंतर्गत कामांवर भर दिला जात आहे. निरिक्षण केंद्राला संपूर्ण काचेच्या खिडक्या लावल्या जाणार आहेत. यासह छताचे पीओपी काम शिल्लक आहे.

चाैकट-
नवीन सरकारकरून अपेक्षा
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून हे काम करण्यात येत आहे. ६० टक्के बांधकाम झाल्यानंतर अडीच वर्षांपूर्वी सत्तापालट झाल्याने केंद्राचे काम बंद पडले ते अद्याप सुरूच झालेले नाही. निदान नव्याने सत्तेवर आलेल्या महायुतीचे सरकार पक्षी केंद्राच्या बांधकामाकडे लक्ष घालून ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा पक्षीप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

कोट-
किहीम येथील डॉ. सलीम अली पक्षी अभ्यास व पर्यावरण निरीक्षक केंद्राचे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून काम करण्यात येत आहे. केंद्राच्या बांधकामाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्राचे अंतर्गत काम होणे बाकी आहे. उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे केंद्राचे काम रखडले आहे. उर्वरित निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.
– राहुल शेळके, उपअभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद रायगड