आदिवासी बांधवांसाठी असलेल्या धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजनेची
जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी –अतिरिक्त सचिव-डॉ.नवल जीत कपूर
रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग; धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील आदिवांना बांधवांना देण्यासाठी जिल्ह्य प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त सचिव,आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार डॉ.नवल जीत कपूर यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आत्माराम धाबे, उपजिल्हाकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त सचिव, डॉ.नवल जीत कपूर म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन योजना या नावाने दि.15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु झालेल्या योजनेचे दि.2 ऑक्टोबर 2024 रोजी धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजना नावाने नामांतर करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी ही एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा आदिवासी बांधवांना लाभ द्यावा. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा विकास व्हावा, त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक आदिवासी बांधवांना मिळावा याकरिता संबधित विभागातील अधिकाऱ्यांनी महिन्यातील एक दिवस या योजनेसाठी द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या योजनेसाठी सकारात्मक भूमिका ठेवून काम केल्यास योजना अधिकाधिक गतिमान होईल व त्याचा लाभ आदिवासी बांधवांना मिळेल. ज्या आदिवासी बांधवांचे बँक खात्याशी आधार संलग्न नसेल तर त्यांचा सर्व्हे करुन ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आदिवासीच्या विविध योजनांसाठी असलेले अनुदान वाढवून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. या योजनेविषयी काही अडचणी असतील तर अधिकारी वर्गाने माझ्याकडे संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपिस्थित अधिकाऱ्यांना केले.
यावेळी उपस्थितांना दूरदृष्य प्रणालीद्वारे धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजनेची माहिती देण्यात आली.