सुंदर मुली दाखवून लग्न लावायचं, अकोल्यात फसवणूक करणारी टोळी गजाआड.
अकोला :- युवकांना सुंदर मुली दाखवून त्या मोबदल्यात लाखोंची रक्कम उकळून फसवणूक करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील पांघरी नवघरे इथल्या म्होरक्यासह पाच जणांची टोळी डाबकी रोड पोलिसांनी गजाआड केली आहे. या टोळीने अनेकांना लाखोंचा गंडा घातला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे असा काही प्रकार तुमच्यासोबतही घडत असेल तर सावधान राहा आणि वेळीच पोलिसांना याची माहिती द्या असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम तुळशीराम करवते ऊर्फ योगेश मूळ नाव गुलाब नारायण ठाकरे हा या टोळीचा म्होरक्या असून त्याचे साथीदार शंकर बाळू सोळंके रा . सातमैल वाशिम रोड अकोला, संतोष ऊर्फ गोंडू सीताराम गुडधे राहणार आगीखेड ता . पातूर, हरसिंग ओंकार सोळंके रा .चांदुर ता . अकोला या तीन जणांसह एक महिला जळगाव खान्देश इथल्या तर दुसरी अकोला इथली असून या पाच आरोपींना डाबकी रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील करमूड या गावातील रहिवासी अतुल ज्ञानेश्वर सोनवने पाटील आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी इथला रहिवासी 28 वर्षीय राहुल विजय पाटील यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.