भारतीय संविधानाची मूल्य युवकांनी आत्मसात करावी: डॉ. बबन मेश्राम
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
जिल्हा युवा संमेलन
✍मनोज खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
9860020016
गोंदिया : – आपल्या लोकशाहीचा आत्मा संविधान असून समता, बंधुता, स्वातंत्र्य, विकासाच्या समान संधी हे केवळ आपल्याला संविधानामुळेच प्राप्त झाले आहे. आपल्या देशाचे संविधान हे जगात श्रेष्ठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमूद केलेली सर्व मूल्य मानवी जीवनात अत्यंत मोलाची असून युवकांनी ही मूल्य आत्मसात करावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. बबन मेश्राम यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नेहरू युवा केंद्र संगठन गोंदियाच्या वतीने आयोजित जिल्हा युवा महोत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते हे होते. जिल्हा युवा अधिकारी श्रुती डोंगरे, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या संगीता घोष व स्काऊट गाईडचे श्री. तपासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संगिता घोष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जिल्हा युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित युवा महोत्सवात संविधान आणि आपण, सामाजिक कार्यात आपला सहभाग, फिट युवा फिट इंडिया आणि सारस संवर्धन व संरक्षण या विषयावर युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सर्वात बळकट लोकशाही प्रधान देश म्हणून भारताचा जगात गौरव आहे. ते केवळ आपल्या राज्य घटनेमुळे आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या अधिकाराचा व स्वातंत्र्याचा विचार अतिशय सखोलपणे घटनेत नमूद केला आहे. राज्यघटना केवळ पुस्तक नसून आपल्या जगण्याचा सार आहे. प्रत्येक व्यक्तीने राज्यघटना आपल्या घरात कायमस्वरूपी ठेवावी आणि नित्य आचरणात आणावी असे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.
राज्यघटनेच्या मूल्याचा धागा पकडून संगिता घोष म्हणाल्या की, नेहरू युवा संगठनचे प्रतिनिधी म्हणून आपण समाजातील प्रत्येक घटकांना त्यांचे हक्क व अधिकार याबाबत जागृत करायला हवे. त्याचप्रमाणे सामाजिक ऐक्य व सलोखा याबाबत जाणीव करून द्यायला हवी. नागरिकांनी आपले हक्क व अधिकार यासोबतच कर्तव्यसुद्धा नीटपणे बजावायला हवे. राज्य व केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनेची अंमलबजावणी योग्यप्रकारे होते किंवा नाही यावरसुद्धा नजर ठेवणे आपली सामाजिक जबाबदारी आहे असे त्या म्हणाल्या.
दुर्मिळ होत चाललेला सारस पक्षी गोंदिया जिल्ह्याचे वैभव असून शेतकऱ्यांचा मित्र आहे. केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळणारा सारस पर्यटक व पक्षी अभ्यासकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. सारस संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहे. असे असले तरी सारसांचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी ही अपेक्षा आहे. युवा स्वयंसेवक ज्या ज्या वेळी ग्रामीण भागात जातील तेव्हा त्यांनी नागरिक व शेतकरी बांधवांमध्ये सारस संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जाणीव जागृती करावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले.
स्काऊट गाईडचे श्री. तपासे यांनी व्यायामाचे महत्त्व विशद करून फिट युवा फिट इंडिया या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी श्रुती डोंगरे यांनी केले. नेहरू युवा केंद्राने राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. युवकांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्र सदैव तत्पर आहे असे त्यांनी सांगितले. वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या युवकांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास युवक-युवती उपस्थित होते.