मिळकतखार भराव प्रकरणात सरकारी बनावट पासेस बनविल्याचे उघड.
तहसिलदार अलिबाग यांना कायदेषीर करवाईसाठी केले प्राधिकृत.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील मिळकतखार भराव प्रकरणात सरकारी बनावट पासेस बनविल्याचे सरकारी चौकशी मधून सिध्द झाले असून दोशीं विरोधात कायदेषीर कारवाईसाठी तहसिलदार अलिबाग यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राधिकृत केले असल्याने माती माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अलिबाग तालुक्यातील जमीनीचे भाव गगनाला भिडलेले असल्याने न्यायालयाचे आदेश, शासनाचे निर्बंध झुगारून जमीनी बळकावण्याचे प्रकार येथे राजसोसपणे सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मिळकतखार प्रकरणाने भूमाफियांचे विविध कारनामे समोर येत होते. तालुक्यातील मिळकखार येथील वासवानी कंपनीने कांदळवन, सीआरझेड व ना विकास क्षेत्रामध्ये केलेला बेकायदेशीर भरावासाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बोगस पावत्या छापून शासनाची करोडो रुपयांची फसवणुक केल्याचे उघड झाले होते. गौणखनिजांवरील रॉयल्टी भरण्याचे बनावट पावती बुक छापून महसूल विभागाला करोडोंचा चुना लावण्याचे काम मिळकतखार येथील भराव करणाऱ्या कंपनीकडून सुरू आहे असल्याची तक्रार मिळकतखार ग्रामस्थ विनय कडवे व जगदीश म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाल्यावर भूमिफीयांच्या या फसवेगिरीला वैतागून जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले होते.
जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी या प्रकरणी सखोल चौकषी केली असता वाहतुक पासेसची पडताळणी महाखनिज प्रणालीचे जिल्हा प्रतिनिधी यांचेकडून करुन घेतलेली असून सदर वाहतूक पासेस महाखनिज प्रणालीवर दिसून येत नाही. सबब सदरचे वाहतूक पासेस अवैध असल्याचे दिसून येत आहेत असे स्पष्ट पणे नमूद केले आहे. तरी प्रस्तुत प्रकरणाचे गांर्भिय लक्षात घेवून, संबंधित दोषीविरुध्द कायद्यातील व नियमातील प्रचलित तरतुदीनुसार अंतिम कठोर कारवाई करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल या कार्यालयाकडे माहितीस्तव सादर करण्यांत यावा असे आदेष तहसिलदार अलिबाग यांना देण्यांत आले असल्याची माहिती या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिली आहे.