विज्ञान भवन येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

37

विज्ञान भवन येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380

नवी दिल्ली :- विज्ञान भवन येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष शरद पवार, संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर आदी उपस्थित होते.प्रधानमंत्र्यांनी सर्वांचे मराठीत स्वागत केले.
भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले.
मराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही. त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे. संत ज्ञानेश्वरांनी ‘माझ्या मराठाचि बोलू कौतुके, अमृताते पैजा जिंके’ असे म्हटले आहे. मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. मराठी भाषा शिकण्याचा मी प्रयत्न निरंतर करीत आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहे. मराठी साहित्याने समाजातील वंचित, शोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्याचे कार्य केले. मराठी भाषेने समृद्ध दलित साहित्य देण्याचे कार्य केले – प्रधानमंत्री श्री. मोदी
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. जगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह आपण शिकलो आहोत. संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. – मुख्यमंत्री श्री. फडणवीस
भाषा ही आपलेपण निर्माण करणारी, जोडणारी असावी. मराठी भाषेचे महत्त्व संत ज्ञानेश्वर, एकनाथांनी मांडले आहे. भाषा जीवनात असावी लागते, ती जैविक गोष्ट असून, ती बोलली तर जीवंत राहते. संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते. या सर्वांमुळे मराठीला अभिजातपण आले आहे – संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर
नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. त्यामुळे वर्तमान काळात साहित्यिकांवर महत्वपूर्ण जबाबदारी असल्याचे स्वागताध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले.
सोहळ्यास संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे , कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविकात श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रुकय्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शमीमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, विनय सहस्रबुद्धे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.