आर्य वैश्य कोमटी समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास ओबीसी संघटनांचा जाहीर विरोध : डॉ. अशोक जीवतोडे
♦️महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या दौऱ्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विरोध निदर्शन आंदोलन
♦️महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षाला देणार निवेदन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 24 फेब्रुवारी
आर्य वैश्य कोमटी समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यास विरोध दर्शवित स्थानिक जनता महाविद्यालय चौकात सोमवार, २४ फेब्रुवारी ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे व राष्ट्रीय सचिव सचिन राजुरकर यांचे नेतृत्वात निदर्शन आंदोलन करण्यात आले.
ओबीसी समाजात आर्य वैश्य कोमटी समाजाचा समावेश करण्याच्या अनुषंगाने चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा मंगळवार, २५ तारखेला दौरा कार्यक्रम आहे, मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघ समवेत समस्त ओबीसी समाजाचा आर्य वैश्य कोमटी समाजाला ओबीसी मधे समाविष्ट करण्यास जाहीर विरोध आहे, असे ठणकावून सांगत आंदोलन केले. याच अनुषंगाने मंगळवार, २५ फेब्रुवारी ला महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांना निवेदन देण्यात येणार आहे.
आर्य वैश्य कोमटी समाजाची सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी तपासून बघावी, आर्य वैश्य कोमटी समाज हा आशिया खंडातील प्रथम पाच आर्थिक दृष्ट्या सधन समाजात येतो. त्यानुसारची आकडेवारी आपण तपासून घ्यावी व या सधन समाजाला ओबीसीत सहभागी करुन घेऊ नये, असे ओबीसी संघटनांचे म्हणणे आहे.
असे झाल्यास ओबीसी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या स्वरूपात लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, व त्या अनुषंगाने उत्पन्न होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जवाबदारी आयोगाची असेल, त्यामुळे खबरदार आर्य वैश्य कोमटी या सधन जातीचा ओबीसीत समावेश कराल तर, असे विदर्भवादी ओबीसी नेते तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी यावेळी म्हटले आहे.
आर्य वैश्य कोमटी समाजाला मागासवर्गीय ठरविण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत, ते चूक आहे व ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सचिव सचिन राजुरकर यांनी म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दिनेश चोखारे, जिल्हा अध्यक्ष नितीन कुकडे, सतीश भिवगडे, गौरव जुमडे, आदी व मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.