बुद्धू विद्यार्थ्यांचा वाली कोण?

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

बुद्धू मुलं…….ज्याचा बुद्ध्यांक हा अतिशय कमी आहे. अशी मुलं शिक्षणात कमी पडतात. अशा मुलांना शिकवतो म्हटल्यास तारेवरची कसरत असते. अशावेळेस त्या शिक्षकांना त्या मुलांना शिकविण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.

ती बुद्धीची कसरतच असते शिक्षकांची. शिक्षक मुलांसाठी अपार मेहनत करीतच असतात. पण अशी अपार मेहनत करणारी शिक्षक मंडळी काही जास्त प्रमाणात नसतात. त्यांची संख्या फार कमी असते.

शिक्षक मेहनत घेतात यात काही वावगं नाही. परंतू काही काही अशाही शाळा आहेत की ज्या शाळेत मुलांना शिकवायचे असल्यास आधी त्यांच्या आईवडीलांची पात्रता परिक्षा घेतली जाते. ती पात्रता परिक्षा पैशाची नसते. तर तो पालक किती शिकलेला आहे? त्याला इंग्रजी वाचता येतं का? तो मुलांना शिकवण्या लावू शकेल काय? यासाठी असते.

शिकवण्या लावू शकेल काय? तो पालक किती शिकलेला आहे? त्याला इंग्रजी वाचता येते काय? हे प्रश्न. कशासाठी? तर आम्हाला शाळेत जास्त मेहनत घ्यावी लागू नये यासाठी. पालकांना वारंवार सांगता यावं की त्यानं आपल्या मुलांना तो शिकलेला असल्यानं शिकवावं. जर त्याला तसं शिकवता येत नसेल तर त्याच्या मुलाला काढून टाकणार शाळेतून यासाठी त्या पालकांचं शिक्षण हवं. दुसरा मुद्दा हा की त्या पालकाला इंग्रजी यावं. कारण अलीकडे स्पर्धेचा काळ. अशा काळात जर त्या पालकाला इंग्रजीचं ज्ञान नसेल तर तो पालक आपल्या मुलांची इंग्रजी कशी काय हाताळू शकेल? हा प्रश्न शाळा प्रशासनाला पडतो. म्हणूनच ते त्या पालकाला इंग्रजी येणं पाहतात. तसाच तिसरा मुद्दा आहे, तो म्हणजे त्या पालकानं त्या मुलांची स्वतःच शिकवणी लावायची सोय उपलब्ध करावी. का? तर तो मुलगा अभ्यासात आणि शिक्षणात मागे पडू नये.

हा झाला अलीकडच्या शाळेतील व्यवहार. आता शिकवणी वर्गाचं सांगतो. शिकवणी वर्गाचं सांगत असतांना मला एकदा जो फोन आला ॲकेडमीकडून त्याचा उल्लेख करणं गरजेचं समजतो.

“हॅलो.”

“हं, बोला.”

“मी अमूक अमूक ॲकेडमीकडून बोलतेय.”

तसं ॲकेडमीकडे बोलायला मुलीच असतात. कारण मुलींचा आवाज ऐकू आला की चांगली चांगली पुरुषमंडळी पिघळतात व न करणारं कार्यही करु पाहतात. म्हणून खास करुन ॲकेडमीनं ग्राहक खेचण्यासाठी केलेली स्पेशल सोय.

“आपली मुलगी दहावीत आहे ना.”

“होय. मग?”

“आमची अमूक अमूक ॲकेडमी आहे. शिकवणी लावायची असेल तर सांगा?”

तिचा प्रश्न. ते ऐकून मी तिची फिरकी घेण्यासाठी केलेलं बोलणं.

“सध्या नववीतच आहे. पास व्हायची आहे. पास झाल्यावर सांगेन.”

“अहो, सगळी मुलं पासच होतात. हुशार आहे ना.”

“नाही. हुशार नाही. त्यामुळंच तर म्हटलं की पास झाल्यावर सांगेन. अन् मला सांगा आतापासूनच शिकवणी का बरं लावायची? पास झाल्यावर पाहू ना.”

“अहो, इंटरव्ह्यू घ्यावा लागतो.”

“कोणाचा?”

“कोणाचा म्हणजे? आपला. आपण किती शिकले आहात ते पाहावं लागेल की नाही.”

“का बरं?”

“आपली मुलगी मेरीटला आणायची असेल तर ते पाहावं लागेल की नाही?”

“हे बघा, माझी मुलगी तेवढी हुशार नाही व मिही जास्त शिकलेला नाही व माझी पत्नीही. हं, पैसे लावू शकतो मी. परंतू निकाल लागल्यावरच. चालेल का? मलाही वाटतं की माझी मुलगी मेरीटला यावी. बोला येईल का?”

“नाही येणार.”

“का बरं?”

“अहो, मुलगी तेवढी हुशार पाहिजे. त्याचबरोबर तिचे मायबाप. तिचे मायबाप दहावी असून चालत नाही. ते कमीतकमी एमएससी, बीएससी तरी पाहिजेत.”

“हो का? नाही बा. आम्ही तेवढे शिकलेलो नाही.”

“बरं मग ठीक आहे. ही ॲकेडमी तुमच्या काही कामाची नाही.”

“म्हणजे? मी आणू नाही का पास झाल्यावर मुलीला आपल्या ॲकेडमीत?”

“नाही, मुळीच नाही.”

“का बरं?”

मी त्याचं कारण विचारत असतांनाच त्या मुलीनं फोन कापला.

मी थोडासा फिरकी घेण्यासाठीच बोललो. परंतू माझं ते बोलणं ऐकताच त्या मुलीला समजलं की हे पालक काही जास्त शिकलेले नाहीत व यांची मुलगीही जास्त हुशार नाही. तेव्हा यांच्या मुलीवर कोण मेहनत घेणार?

तिच्या मनातील वावगे विचार. तिचं बरोबर होतं. तसं पाहता प्रत्येकच शिकवणी वर्गाची तशी भावना. तसा प्रभावपणा. एकही नापास होवू नये हे त्यांचं ब्रीद. त्यातच बरीचशी मुलं मेरीटला यावीतच. हे ठरलेलं. शिकवणी वर्गात मुलं मिळवायचीय. म्हणूनच त्यांचं तसं वागणं. शेवटी पोटाचा प्रश्न. मग कोण येणार मेरीट? झोपडपट्टीतील गण्या, श्याम्या तिम्या. ज्याचे आईबाप दोघंही दिवसभर राबायला जातात कामावर. त्यांना त्यांच्या मेहनतीपेक्षा कमी वेतन मिळतं. ते जर कामावर गेले नाहीत तर त्यांच्या घरची चूलच पेटत नाही. जे शिकलेले नाहीत. मात्र त्या टोलेजंग इमारतीतील पॅकबंद सोसायटीतील मुलं मेरीटला येणार. ज्यांचे मायबाप बरेच शिकलेले असतात. जे वशिलतेबाजीनं मोठमोठ्या नोकरीवर असतात. जे भ्रष्टाचार करुन लाखो रुपये कमवतात. जे भरपूर शिकलेले असतात. परंतू आपल्या शिकलेपणाचा वापर भ्रष्टाचार करण्यासाठी करतात.

ह्या शिकवणी वर्गातून नेहमीच घडून येणा-या गोष्टी. अलीकडील मेरीट आणणा-या शिकवणी वर्गात गरीबांची व कमी शिकलेल्या लोकांची मुलं दिसत नाहीत. तसंच अलीकडे मेरीट येणा-या शाळेतही गरीबांची व कमी शिकलेल्या लोकांची मुलं दिसत नाहीत. परंतू मुलं मेरीटला आल्यास त्यांचंच नाव होतं. अशा शाळेतून आणखी मुलं मेरीटला यावीत. म्हणून या मेधावी मुलांचा सत्कार केला जातो. अशा शाळांना देणग्याही दिल्या जातात. परंतू ज्या शाळेत गरीबांची मुलं आहेत. निरक्षरांची मुलं आहेत. ज्या मुलांना शिकवायचे म्हटल्यास तारेवरची कसरत आहे. अशी मुलं अशा गरीबांच्या शाळेतून कमीतकमी साठ टक्केपर्यंत जाणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. त्यांचे साठ टक्के गुण म्हणजे त्यांचं मेरीटच असतं. परंतू त्यांची कोण दखल घेतं? कोणीच नाही. याबाबत मी सांगतांना एवढंच म्हणेल की एखाद्या रोपट्याला पुरेशी त्यांची वाढ होण्यासाठी पुरेसं वातावरण दिलं तर त्यांची वाढ चांगली होणार. याउलट एखादं रोपटं अवर्षणात जगत असेल तर, तर त्या रोपट्याची वाढ होईल काय? मुळातच होणार नाही किंवा एखाद्या मुलाला चांगलं खायला प्यायला दिल्यास तो मुलगा धष्टपुष्ट दिसेल अन् नाही दिल्यास तो धष्टपुष्ट दिसेल काय? नाही दिसणार. तेच गणित असतं मेधावी मुलात. मुलांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळालं की ती मेरीटला येणारच आणि नाही मिळालं तर ती मेरीटला येणारच नाहीत.

आज अशा ब-याच शाळा आणि शिकवणी वर्ग आहेत की जे पालकांचं इंग्रजीचं ज्ञान पाहतात. त्यातच ते किती शिकलेले आहेत तेही पाहतात आणि मुलगा जर अभ्यासात कमजोर आढळल्यास पालकांनाच वेठीस धरतात. शेवटी असे पालक नाईलाजानं शिकवण्या लावून देतात. सोबतच शिकवणी वर्गातील व शाळेतील अभ्यास स्वतः आपल्या पाल्यांकडून घरी करवून घेतात. मग ती मुलं मेरीटला येणार नाही तर काय? मेहनत पालकांची असते व नाव शाळेचं आणि शिकवणी वर्गाचं होतं. का अशा शाळा एखाद्या झोपडपट्टीतील गरीबांच्या मुलाला शाळेत प्रवेश देवून मेरीटला आणू शकत नाहीत? का असे शिकवणी वर्ग ग्रामीण भागातील एखाद्या गरीबाच्या मुलाला दत्तक घेवून मेरीटला आणत नाहीत? परंतू ते तसे करीत नाहीत. मुलं मेरीटला येतात. कारण त्यांना सगळं आयतं मिळतं. आयतं म्हणजे हुशार मुलं आणि हुशार पालक. तसंच श्रीमंत पालक आणि श्रीमंत मुलं. सगळं पोषक वातावरण.

बुद्धू आणि विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आजच्या काळात कोणी वाली नाही. त्यांनी शिकावं यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतांना दिसतं. परंतू ती मुलं शिकतील तेव्हा ना. तिही मुलं शिकू शकतात. त्यांना तसं वातावरण मिळालं तर…… परंतू तसं वातावरण आजच्या शाळा व शिक्षक द्यायला तयार नाहीत. ते स्वतःच पालकांना सांगतात. शिकवणी लावून द्या. तेही एवढं शिकविण्याचं वेतन मिळत असतांना. अन् शिकवणी वर्गही पालकांकडून तीच अपेक्षा ठेवतात. शिकवलेलं पालकांनं पुन्हा घरी शिकवावं. जर तो पालक निरक्षरपणानं घरी शिकवायला तयार नसल्यास अशा पालकांची मुलं शिकवण्या लावूनही मागं पडतात. ती मेरीटला येणं दूरच. ती साध्या सोप्या पद्धतीच्या असलेल्या परिक्षेतही पास होत नाही. आज मुलं कसेतरी आठवीपर्यंत तरी शिकतात. कारण मुलांना आठवीपर्यंत नापास करता येत नाही म्हणून. जर ह्याच ठिकाणी मुलांना पास होण्याची संधी नसती तर, अशी मुलं ही पहिली दुसरीच्या पुढे गेलीच नसती. हे तेवढंच सत्य आहे. यावरुन बुद्धू मुलांचा वाली कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. बुद्धू मुलं मायबाप म्हणतात म्हणून शाळेत येतात. कशीतरी शाळा सुटेपर्यंत बसतात. सुट्टी झाली की घरी जातात. दप्तर फेकतात व निव्वळ खेळतात. मायबाप जेव्हा कामावरुन घरी येतात. तेव्हा ती झोपेच्या आहारी गेलेली असतात. सकाळीही कामावर जायच्या घाईनं मायबाप त्यांचा अभ्यास करवून घेवू शकत नाहीत.

अशी मुलं अभ्यासात मागे पडतात. कारण ना त्यांचा अभ्यास मायबाप करवून घेत, ना शाळेतून शिक्षक करवून घेत. मग ती अभ्यासात मागे पडणारच. शेवटी ती मुलं अशी मागे पडतात की ती कशीबशी आठवीपर्यंत तर शिकतात आणि आठवीनंतर शाळा सोडतात. काही काही मुलं कशीतरी शालान्तपर्यंत जातात. मग नापास होतात. ती मुलं नापास झाली की अगदी अल्प वयातच कामाला लागतात व जीवनभर वेठमजूर म्हणून जीवन घालवीत असतात. त्यानंतर त्यांची संततीही तशीच अल्प शिकून तिही वेठमजूरच बनतात. ही वास्तविकता आहे. त्यामुळंच बुद्धू मुलांचा वाली कोण? हा प्रश्न युगानूयुगे पडणारच आहे. केवळ आणि केवळ शिक्षकांमुळे. शिक्षकच या बुद्धू मुलांना न्याय देवू शकतो. परंतू तो तरी काय करणार? तोही विवश आहे.

अलीकडे शासन जरी आठवीपर्यंत नापास करु नये हे धोरण राबवीत असलं तरी कामं एवढी वाढवली आहेत की शिक्षकांना ती कामं करावी लागतातच. व्यतिरीक्त ऑनलाईन कामंही वाढवली आहेत. त्यातच शाळेत अशी ऑनलाईन कामं करायला बाबू नाही. त्यामुळंच शिक्षकांची तारांबळ उडते. ते सतत ऑनलाईन कामात व्यस्त असतात. मग अशावेळेस विद्यार्थ्यांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष होते व ज्यातून बुद्धू मुलांचं नुकसान होत असतं. हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळंच सरकारनं यावर उपाय म्हणून ज्या ठिकाणाहून देशाचं भवितव्य घडतं. त्या प्रत्येक शाळेत ऑनलाईन कामं करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकतरी बाबू द्यावा. म्हणजे बुद्धू विद्यार्थ्यांचीही गळचेपी होणार नाही व शिक्षकांनाही मुलं का शिकवली नाही म्हणून बहाणा सापडणार नाही. तेही चांगले विद्यार्थी घडवतील. विद्यार्थ्यांवर चांगली मेहनत घेतील नव्हे तर त्यानंतर बुद्धू मुलंही शाळेत दिसणार नाही. तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना पालकांचा इंटरव्ह्यू घेवून प्रवेश नसावा. तसे आढळल्यास अशा शाळेवर कार्यवाहीची सोय असावी. जेणेकरुन चांगल्या शाळेतही बुद्धू मुलांना शिकता येईल. प्रत्येक शाळेत केवळ आणि केवळ हुशारच विद्यार्थ्यांचाच विचार होवू नये तर बुद्धू विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा हे तेवढंच खरं. मग कोणावरही बुद्धू विद्यार्थ्यांचा वाली कोण? हे म्हणण्याची वेळ येणार नाही व कोणताच बुद्धू विद्यार्थीही दिसणार नाही. अन् दिसलाच तर ते शिक्षक कार्यवाहीस पात्र असतील यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here