‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाला माणगांवकरांचा सलाम; भर पावसात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाला माणगांवकरांचा सलाम; भर पावसात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

✍️ निखिल सुतार
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133

माणगांव –देशासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या भारतीय सैन्याच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी माणगांव शहरात दिनांक २४/०५/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता तिरंगा यात्रा काढण्यात आली.
‘ऑपरेशन सिंदूर’ या अतिरेक्यांविरोधातील यशस्वी कारवाईनंतर केंद्र सरकार आणि भारतीय सैन्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी, तसेच शौर्याचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला भर पावसातही शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ही यात्रा माणगांव बसस्थानकापासून सुरू होऊन कचेरी रोड मार्गे पुढे सरकत शहीद यशवंतराव घाडगे स्मारकापर्यंत शांततेत आणि अनुशासनात पार पडली.
पावसाच्या सरी अंगावर घेत, हातात तिरंगा झेंडा, ओठांवर देशभक्तीचे घोष, आणि डोळ्यांत सैनिकांप्रती कृतज्ञतेचे भाव… अशा दृश्यांनी माणगांवचे रस्ते देशप्रेमाने न्हाले.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि देशभक्तीची लहर संपूर्ण शहरभर पसरली.

यात्रेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या जवान रुपेश गायकवाड यांचा झालेला सन्मान.
शहीद घाडगे स्मारकाजवळ झालेल्या छोटेखानी पण भावनिक कार्यक्रमात गायकवाड यांचा शाल, श्रीफळ आणि गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माणगांव तालुक्यातील माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास माजी सैनिक संघटनेचे माजी अध्यक्ष विष्णू सावंत, सुरेश गायकवाड, सचिव हृषीकेश शिंदे, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी सुरेश जैन, भाजप युवक जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, तालुकाध्यक्ष परेश सांगले, महिला मोर्चा प्रदेश सचिव यशोधरा गोडबोले, स्वराज्य अकॅडमीचे संस्थापक परेश कोटकर आणि कमांडो अकॅडमीचे तरुण-तरुणी उपस्थित होते.

ही तिरंगा यात्रा केवळ राष्ट्रध्वज हाती घेऊन चालण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती होती सैन्याच्या बलिदानासमोरील आदरांजली आणि देशासाठी एकजुटीचा आवाज.
माणगांवकरांनी या माध्यमातून ठामपणे सांगितलं – “आम्ही देशाच्या आणि सैन्याच्या पाठीशी आहोत, तेही भर पावसात उभं राहून!”