बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांची छायाचित्रे , मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे छायाचित्र नाही

संदिप जाबडे

मीडिया वार्ता न्यूज

पोलादपूर तालुका प्रतीनिधी

संपर्क – 8149042267

२३ जून, पोलादपूर:  मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूरपासून १२ कि.मी.अंतरावर राजेवाडी, पुणे, भोर, वरंध घाटाच्या रस्त्यालगत राज्यातील महाविकास आघाडीतील राजकीय घडामोडींसंदर्भात पहिला राजकीय बॅनर झळकला आहे.

या बॅनरवर राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रतिमा नसून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांची छायाचित्रे आकर्षक आणि लक्ष्यवेधी ठरत आहेत. या बॅनरवरून एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या सर्व आमदारांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांची एकनाथ शिंदे समर्थक गटाच्या विधीमंडळ प्रतोदपदी निवड झाल्यानंतर आमदार भरत गोगावले समर्थकांमध्ये आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. त्याप्रकारचे स्टेटस प्रसारमाध्यमांवर देखील पाहायला मिळाले. त्यातच त्यांचे निवासस्थान असलेल्या ढालकाठीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत लावण्यात आलेला हा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

महाड, बिरवाडी, राजेवाडी, वरंध, पोलादपूर अशा प्रमुख शहरवजा गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी लावलेल्या या बॅनरकडे वाहने आणि दुचाकी वाहनांतून जाणारे प्रवासी व स्थानिक जनता आवर्जून थांबून पाहत आहेत. मात्र महाड विधानसभा क्षेत्रामध्ये या बॅनर वरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here