उच्चशिक्षित शिपाई पदाच्या रांगेत
जिल्हा क्रीडा संकुल येथे पोलीस भरती सुरू
दर दिवशी बाराशे जणांची शारीरिक चाचणी
रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३
अलिबाग :-रायगड पोलीस दलात ४२२ शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेला शुक्रवारी सुरुवात झाली आहे. यासाठी राज्यभरातून जवळपास ३१हजारअर्ज आलेत.वकील, शिक्षक इंजिनिअर यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेले उमेदवारही शिपाई पदाच्या रांगेत असल्याचे वास्तव समोर आले. पोलीस दलात आपली निवड व्हावी, यासाठी भर पावसात उमेदवार तहान भूक विसरून परीक्षा देत आहेत.
भरती प्रक्रियेत लातूर ,बीड , गडचिरोली नाशिक ,परभणी येथील उमेदवारांची संख्या जास्त आहे.
आपल्या जिल्ह्यातील वाढती स्पर्धा आणि मर्यादा मर्यादित जागांमुळे हे उमेदवार रायगड जिल्ह्यात नशिबात आहे. रायगड मधील तरुण स्पर्धा परीक्षेच्या नादात न पडता मुंबईसारख्या शहराकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.
बाहेरून आलेल्या तरुणांसाठी नेहुलीतील क्रीडा संकुलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु उमेदवारांच्या तुलनेत व्यवस्था अपुरी आहे . क्रीडा संकुलात राहण्यासाठी जागा न मिळाल्या अनेक तरुणांनी नेहूली, गोंधळपाडा, संगम या जवळच्या गावांमध्ये मंदिरे ,समाज मंदिर मध्ये , आश्रय
घेतला आहे.
………..
शिक्षक, वकील, इंजीनिअर ही मैदानात
दर दिवशी १२०० जणांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येते.यातील बहुतांश तरुण उच्चशिक्षित आहेत. तरुणांनी दाखल केलेल्या अर्जावरून माहिती घेतली असता एलएलबी पूर्ण करून सनद घेतलेले वकील, बीएड परीक्षा देऊन शिक्षक म्हणून होण्याच्या प्रतीक्षेत असणारे, नेट-, सेट परीक्षा देऊन प्राध्यापकाच्या नोकरीसाठी अनेक संस्थांच्या कार्यालयात घिरट्या घालणारे, आयटी इंजिनियर ,बिजनेस मॅनेजमेंट केलेले उमेदवार हाफ पॅन्ट वर मैदानात कस लावताना दिसतात.
…………
धावपट्टीवर छप्पर
दुसऱ्या जिल्ह्यातील तरुणांना येथील पावसाचा,वातावरणाचा सराव नसल्याने शारीरिक चाचणीसाठी अर्ध्या धावपट्टीवर छप्पर टाकण्यात आले आहे. येथे ,१६०० मीटर धावणे ,गोळा फेक, भालाफेकीच्या चाचण्या घेतल्या जातात.दोन दिवस पावसाचा जोर जास्त असल्याने भरती प्रक्रियेचा वेग कमी होता. रविवारी सकाळपासून पावसाने उघडी घेतल्याने चाचणीला वेग आला.
………….
वाढती बेरोजगारी अस्थिरता
उच्च शिक्षिता मधील वाढती बेरोजगारी, व्यवसायामध्ये असलेली अस्थिरते मुळे सरकारी नोकरीकडे तरुणांचा कल वाढत आहे. मिळेल ती सरकारी नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी तडफड सुरू असल्याचे चित्र सध्या या भरतीतून पाहावयास मिळते. आय टी क्षेत्रात आलेल्या मंदि ने निर्माण झालेली बेरोजगारी ,सेवा क्षेत्रातील सेवा क्षेत्रातील अनिश्चितता यामुळे निदान पोलीस शिपाई म्हणून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी भर पावसात तरुणांचा संघर्ष सुरू आहे.
…………..
विविध रंगांचे ओळखपत्र
पोलिसांनाही विविध रंगाच्या ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे. भरती कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये म्हणून सफेद नारंगी, पिवळ्या व इतर रंगाचे पास वाटप करण्यात आले आहे. मैदानातील पोलीस बाहेर येऊ शकत नाही.तर बाहेरील पोलीस कर्मचाऱ्यांना जागा सोडता येणार नाहीत. अशी सक्त सूचना अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे
………..
अशी होते शारीरिक चाचणी
मुख्य प्रवेशद्वारा जवळ बारकोड स्कॅनर ने हजेरी घेतली जाते. पत्रकावर फोटो स्वाक्षरी घेतली जाते .त्यानंतर उंची, छातीचे मोजमाप होऊन दस्तऐवज तपासण्यासाठी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये पाठवण्यात येते.तिथे पात्र उमेदवाराची यादी तयार करून आरएफआयटी टेग व चेस्ट क्रमांकाचे वाटप केले जाते.मुख्य मैदानात १०० मीटर धावणे ,गोळा फेक, १६००, मीटर धावणे अशी चाचणी घेतली जाते. वरीलपैकी एकही चाचणी अपत्र झाल्यास त्यास अपात्र टेबलाकडे पाठवण्यात येते.अपात्र उमेदवार प्रथम आणि द्वितीय अपील करू शकतो
………..
पोलीस भरतीमध्ये कोणीही शॉर्टकट मार्ग वापरू नये.उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपली शारीरिक ,बौद्धिक क्षमतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया किमान एक महिना चालणार असल्याने त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. यास अलिबाग मधील नागरिकांनी सहकार्य करावे .
सोमनाथ घार्गे
जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड
…………..
आपल्या जिल्ह्यातील तरुण थोडेसे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी मुंबईकडे धाव घेतात. त्याच वेळेस दुसऱ्या जिल्ह्यातील तरुण रायगडमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काही करण्यात तयार असतात. पोलीस,शिक्षक यासारख्या भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील तरुणापेक्षा बाहेरच्या जिल्ह्यातील तरुणांचे प्रमाण जास्त असते. एकदा का जिल्ह्यात नोकरी लागली की काही वर्षांनी जिल्हाअंतर्गत बदली योजनेचा फायदा घेत हे तरुण आपल्या जिल्ह्यात निघून जातात. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा रिक्त पदाचा प्रश्न निर्माण होतो. रिक्तपदाचां जिल्ह्याच्या प्रशासकीय कारभारावर परिणाम होतो.यासाठी स्थानिक तरुणांना अशा भरती प्रक्रियेत प्राधान्य देणे आवश्यक आहे.
दत्ता ढवळे सामाजिक कार्यकर्ते
………………
भरती होणारी पदसंख्या
#पदनाम पोलीस शिपाई रिक्त जागा ३९१ ,पुरुष २२,५९०, महिला ४५७० एकूण २७०६०
# ब्रँडसमन ९जागा पुरुष १३८३ महिला ३९० एकूण १७७३
# चालक शिपाई, रिक्त जागा ३१ पुरुष २०९६, महिला १३४ एकूण २२३०
# एकूण रिक्त जागा ४२२,पुरुष २६०६९, महिला ४९९४ एकूण ३१०६३
………….