शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व्हेक्षण
• 5 ते 20 जुलै या कालावधीत विशेष शोधमोहीम राबविण्यात येणार
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 24 जून
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी जिल्ह्यात 5 ते 20 जुलै या कालावधीत विशेष शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेतला.
राज्यात बर्याच जिल्ह्यातील कुटुंबे विविध व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर करीत असतात. ही कुटुंबे आर्थिक स्तर निम्न असलेल्या वंचित घटकातील, भुमीहिन अथवा अल्पभुधारक असतात. वीटभट्टी, दगडखाण मजूर, कोळसा खाणीतील मजूर, शेतमजुर, बांधकाम व्यवसाय, रस्ते, पूल, नाले, जिनिंग मील इत्यादी प्रकारच्या कामानिमित्त विविध कामगार स्थलांतरीत होत असल्याने तसेच तमाशा कलावंत व गावोगावी फिरणारे भटके विमुक्त यांच्या स्थलांतरीत मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार 3 ते 18 या वयोगटातील सर्व बालके शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात 5 ते 20 जुलै या दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच योग्य नियोजन करून जास्तीत जास्त शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा, अशा सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या. बैठकीला शिक्षणाधिकारी (प्राथ) अश्विनी सोनवणे, निकिता ठाकरे (माध्य.), राजकुमार हिवारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संग्राम शिंदे आदींची उपस्थिती होती.