कापड व्यापार्याला लुटण्याचा प्रयत्न
• बल्लारपूरातील घटना
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 24 जून
बल्लारपूर येथील बस्ती विभागात असलेल्या मालू प्रतिष्ठानच्या संचालकाला लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची फिर्याद मालू यांनी रविवारी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वस्ती विभागातील गांधी चौक परिसरात अनेक वर्षांपासून मालू परिवाराचे कपड्यांचे दुकान आहे. दुकानामागेच ते वास्तव्याला आहे. शुक्रवारी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास दुकानमालक यश रोख रक्कम घेऊन घराकडे निघाला. दुकान आणि घरामधील अंतर जेमतेम 50 मीटर आहे. घराच्या अगदीच जवळ चाकू घेऊन असलेल्या एकाने यशकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत अन्य दोन साथीदार होते. मात्र तोपर्यंत यश घरात पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. तिघेही तरुण डोक्यावर टोप्या आणि चेहर्यावर मास्क घातलेले होते. दरोड्याचा प्रयत्न फसल्यानंतर सर्व गुन्हेगार तेथून फरार झाले.
घराच्या बाल्कनीत उभे असलेले सुनील आणि त्यांचा भाऊ या दोघांना ही बाब कळली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक दीपक कांकीडवार व त्यांची चमू या प्रकरणाचा तपास करीत आहे. या घटनेनंतर मात्र व्यावसायिकांमध्ये दहशत पसरली आहे.