डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अगाद्य ज्ञानाचा, संघर्षाचा, त्यागाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा. निश्चित करिअरमध्ये यशस्वी व्हाल – करिअर मार्गदर्शक प्रा. मिलिंद कडवईकर यांचे प्रतिपादन
चिपळूण: प्रथम स्वतःची आवड लक्षात घेऊन करिअर निवड करावी.कोणत्याही शैक्षणिक शाखेतील अथवा अन्य कलाकौशल्य करिअर पूरक क्षेत्रातील तुमची ध्येयनिश्चिती हितावश्यक आहे.आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या अपुऱ्या ज्ञानाच्या,अर्धवट माहिती वर विसंबून न राहता आपल्या शिक्षकांचा,पालकांचा किंवा सुज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर करिअरच्या आवडीनिवडी संबंधी निर्णय घेणे योग्य ठरेल “असे प्रतिपादन नामवंत करिअर मार्गदर्शक प्रा. मिलिंद कडवईकर यांनी श्रमिक कृषी संवर्धन संस्था , आरवली आणि मा. विलासजी होडे स्मृती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या परत्वे ‘करिअर निवडताना या विषयावर मार्गदर्शन करताना केले. ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासा संबंधी दाखले देताना ते पुढे म्हणाले, ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अगाद्य ज्ञानाचा, संघर्षाचा, त्यागाचा आदर्श विद्यार्थी वर्गाने आपल्या डोळ्यासमोर ठेवा, निश्चितच तुम्ही निवडलेल्या करिअरमध्ये यशस्वी व्हाल. प्रा. कडवईकरांच्या प्रबोधनात्मक करियर मार्गदर्शनांनी उपस्थित विद्यार्थी ,तरुणवर्ग, पालकवर्ग, मान्यवर अक्षरक्ष: मंत्रमुग्ध झाले.
गेली चार वर्षे सामाजिक, शैक्षणिक, कृषी, साहित्य आदी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील श्रमिक कृषी संवर्धन संस्था आणि मा. विलासजी होडे स्मृती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे आंबतखोल येथील कै.जी.के.खेतले सभागृहात संपन्न झाला.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या विद्यार्थी , तरुण वर्गांना संबोधित करताना मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच,खेरशेत या संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम म्हणाले की,शिक्षणासमवेत देश सेवेची तुम्हाला आवड असेल तर देशाची तिन्ही सैन्यदल तुमच्या स्वागताकरिता सज्ज आहेत. त्याचप्रमाणे मर्चंट नेव्ही हे देखील आजच्या युवा वर्गाचे भविष्य घडवणारे सर्वोत्तम माध्यम असून तुमची जिद्द,चिकाटी,मेहनत शारीरिक क्षमतेसमवेत सातत्यपूर्ण अभ्यासाची आवड असणे आवश्यक आहे. कारण की सैन्य दलातील लष्करी सेवा ही प्रतिष्ठित, आदर्श व्यक्तिमत्त्वाचे छाप पाडणारे करिअर मधील प्रभावशाली माध्यम आहे. तर मर्चंड नेव्ही मधील करिअर म्हणजे अथांग समुद्राशी मैत्री,सहवास,विश्वाची भ्रमंती आणि आर्थिक सुबत्तेचे स्त्रोत आहे.” असे विद्यार्थी, तरुण वर्गाला प्रोत्साहित करताना ते म्हणाले. विशेषता: स्वतः संजय कदम हे मुंबई बंदरातील (गोदी) मरिन विभागात शोअर सारंग या ज्येष्ठ पदावर कार्यरत असताना 35 वर्षात आलेले सुखद अनुभव कथन करून सर्व गुणवंत,प्रज्ञावंत विद्यार्थी/तरुण वर्गाला त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा/सदिच्छा व्यक्त केल्या.
या स्तुत्य उपक्रमातील विशेष लक्षणीय बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कठीण समजल्या जाणाऱ्या एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) स्पर्धा परीक्षा मधून 18 वा क्रमांक मिळवून क्लास वन अधिकारी झाल्याबद्दल धामापूर भडवळेवाडी गावचे सुपुत्र सन्मा. रोहन सखाराम शिगवण आणि एमपीएससी 2023 स्पर्धा परीक्षेत एस.सी प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांकाचा मानकरी ठरलेला आंबव (साखरपा) गावचा सुपुत्र सन्मा. प्रणय शरद जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते महावस्त्र, सन्मानपत्र, संविधान पुस्तिका, देऊन गौरव करण्यात आला. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींना मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेच्या वतीने प्रोत्साहनपरत्वे महावस्त्र,पुष्प करंडक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक देऊन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे एम बी बी एस उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ.सुदर्शन मनोहर भुवड, डॉ.अनिकेत संतोष कांबळे, पोलीस पदावर निवड झाल्याबद्दल प्रियांका दिलीप भुवड आणि नीट परीक्षा देताना बायोलॉजी विषयात 360 पैकी 360 गुण मिळवून देशात प्रथम आल्याबद्दल साक्षी सुरेश सुवरे व युवा साहित्यिक अभय शिगवण यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमात चिपळूण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल देसाई विद्यालय, असुर्डे आंबतखोलचे मुख्याध्यापक अमर भाट यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर कोकरे जिल्हा परिषद गटातील दहावी व बारावी परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या 85 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व फाईल फोल्डर, शाल, संविधान पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विचारपीठावर गुणगौरव सोहळ्याचे नियोजित अध्यक्ष सुभाष नारकर, संस्थेचे अध्यक्ष विलास डिके, यशवंत भांगडे,मातोश्रीचे मुख्य प्रवर्तक संजय कदम, उदय कळंबे, अनंत शिगवण, दशरथ बांबाडे,शैलेश खापरे तसेच सत्कारमूर्ती श्री. रोहन शिगवण, श्री.प्रणय जाधव आदी मान्यवरांसमवेत प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष संतोष मोरे व सचिव प्रदीप सोलकर यांनी आपल्या बहारदार शैलीतून सादर केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता यश फणसे,स्वराज म्हादे, संतोष घोडके, जान्हवी डिके व देसाई विद्यालयाचे कर्मचारी वर्गानी विशेष मेहनत घेतली.