मुंबई / अस्मिता सकपाळ :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला जगातील सर्वोत्कृष्टफलंदाजांमध्ये गणले जाते. कसोटी क्रिकेट असो वा वनडे किंवा टी२० क्रिकेट, विराटची बॅट आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चालते. भारतीय संघ आज एवढा यशस्वी आहे, यात विराटचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

विराटने खूप कमी वेळेत मोठमोठ्या विक्रमांना गवसणी  घातली. जगातील महान फलंदाजांपैकी एक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करण्याच्या आणि सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रमाला तोडण्याची क्षमता कोणत्या खेळाडूत असेल, तर तो विराट आहे. एवढेच नव्हे तर, विराट केवळ दमदार फलंदाजच नाही, तर तो एक उत्कृष्ट कर्णधारदेखील आहे.

विराटने त्याच्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत भारताकडून २४८ वनडे सामने खेळत ११८६७ धावा केल्या आहेत. तर, कसोटीत त्याने ८६ सामन्यात ७२४० धावा आणि टी२०मध्ये ८१ सामन्यात २७९४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण ७० शतकांचा समावेश आहे.

तसं तर, प्रत्येक वर्षी विराटचे फलंदाजी प्रदर्शन प्रशंसनीय असते. पण, विराटच्या कारकिर्दीत २ वर्षे अशी राहिली आहेत, जेव्हा त्याने पूर्ण वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. या लेखात, विराटच्या कारकिर्दीतील त्या २ वर्षांची माहिती देण्यात आली आहे.

२) वर्ष- २०१८ धावा-२७३५

२०१८मध्ये विराटला आशिया चषक आणि निदाहास टी२० तिंरगी मालिका खेळायला मिळाली नव्हती. तरीही विराट २०१८मध्ये पूर्ण वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने पूर्ण वर्षात एकूण ३७ आंतरराष्ट्रीय सामने खेळत २७३५ धावा केल्या होत्या. यात त्याच्या एकूण ११ शतकांचा समावेश होता.

विराटने २०१८मध्ये १३ कसोटी सामने खेळत ५५.०८च्या सरासरीने १३२२ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या ५ शतकांचा समावेश होता. तर, वनडेत त्याने १४ सामने खेळत १३३.५५च्या सरासरीने १२०२ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ६ शतकांचा समावेश होता. तसेच, टी२० क्रिकेटमध्ये विराटने १० सामन्यात ३०.१४च्या सरासरीने २११ धावा केल्या होत्या. पण, तो टी२०त एकही शतक करु शकला नव्हता.

१) वर्ष- २०१७ धावा- २८१८

१९९९ साली भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वनडे आणि कसोटीमध्ये मिळून २६२६ धावा केल्या होत्या. या त्यावेळी कोणत्या फलंदाजाने एका पूर्ण वर्षात मिळून केलेल्या सर्वाधिक धावा होत्या. त्याचा हा विक्रम २००३ मध्ये रिकी पाँटिंगने मोडला होता. पण, कोणताही भारतीय फलंदाज द्रविडचा तो विक्रम मोडण्यात यशस्वी झाला नव्हता. अखेर २०१७मध्ये विराटने द्रविडचा तो शानदार विक्रम मोडला.

विराटने २०१७मध्ये एकूण ४६ आंतरराष्ट्रीय सामने खेळत २८१८ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ११ शतकांचा समावेश होता. विराटने २०१७मध्ये वनडेत २६ सामन्यात ७६.८४च्या सरासरीने १४६० धावा केल्या होत्या. तर, टी२० क्रिकेटमध्ये त्याने १० सामन्यात ३७.३७च्या सरासरीने २९९ धावा केल्या होत्या. तसेच, यात त्याच्या कसोटीतील १० सामन्यातील १०५९ धावांची समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here