कासा येथे रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला; महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन
अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
डहाणू :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूचे प्रकल्प अधिकारी श्री. विशाल खत्री (भा. प्र. से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आज कासा केंद्र येथे रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते, ज्यामध्ये डोंगर जिरा, आजोला, सातपुते, करडू, शिंद, घोसाळा, गळका, दुधी, कारले, कडीपत्ता, भोपळा, गवती चहा, शेवग्याचा पाला, टेटवी, माठ भाजी, भेंडी, काकडी, वांगी, मिरची यांसारख्या भाज्यांचा समावेश होता.
ग्राहकांनी या भाज्यांची खरेदी मोठ्या उत्साहाने केली. भाजी खरेदी करताना ते स्टॉलधारकांना भाजी कशी बनवायची, तिचे पोषणमूल्य व आरोग्यदायी फायदे याबद्दल विचारपूस करताना दिसले. मेहनतीने रानावनातून भाज्या गोळा करून महोत्सवासाठी आणणाऱ्या महिला स्टॉलधारकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद झळकत होता.
या महोत्सवात समृद्धी स्वयंसहायता बचत गटाच्या प्रियांका तांबडा, नियती बचत गटाच्या सुनिता काटकर, दुर्गा बचत गटाच्या इंदू धांगडा, संजीवनी बचत गटाच्या सुनिता कदम, राधिका बचत गटाच्या सुंदर कुंभारे, सरस्वती बचत गटाच्या चंद्रकला गायकवाड तसेच त्यांच्या गटातील महिलांनी सहभाग घेतला.
नियती बचत गटाच्या सुनिता काटकर यांनी सांगितले की, “आम्हाला असे नवनवीन उपक्रम राबवून प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, आम्ही आत्मनिर्भर होऊ आणि आमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागू शकेल. तसेच सरकारने आम्हाला भाजीपाला विक्रीसाठी नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी.”
यावेळी कासा गावचे ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते अजय तुंबडा यांनी माध्यमांशी बोलताना असे मत व्यक्त केले की, “ज्या महिला दररोज रस्त्याच्या कडेला भाजी विकतात त्यांना प्रशासनाने योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकताना त्यांच्या मालावर चिखल, पाणी उडते. त्यामुळे त्यांना व्यवस्थित जागा मिळणे गरजेचे आहे.”
या महोत्सवात सहभागी झालेल्या महिला स्टॉलधारकांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या हातून पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन होत असल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम केवळ आदिवासी समाजाच्या परंपरेचे संवर्धन करणारा ठरला नाही, तर महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नवी दिशा दाखवणारा ठरला.