रायगड जिल्ह्यात एक लाख बाप्पांची होणार प्रतिष्ठापना

रायगड जिल्ह्यात एक लाख बाप्पांची होणार प्रतिष्ठापना

2894 पोलिसांचा ताफा तैनात; चाकरमान्यांसाठी 172 एसटी सज्ज

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- बाप्पाच्या आगमनाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गणेश भक्त सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 484 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये 286 सार्वजनिक व 1 लाख 2 हजार 198 घरगुती गणेशमुर्तींचा समावेश आहे.

गणरायाचे आगमन बुधवारी (दि.27) ऑगस्ट रोजी होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा दहा दिवस अगोदरच गणरायाचे आगमन होणार आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया…’ अशी जयघोष करीत जिल्ह्यामध्ये बाप्पाच्या स्वागताची तयारी जोरात सुरु आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात गणेशमुर्ती बुकींग झाली असून मूर्ती घरी आणण्याची तयारी सुरु झाली आहे. काहीजण आदल्या दिवशी मंगळवारी तर काहीजण बुधवारी गणेशमूर्ती घरी आणणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी नशा मुक्तीसह बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छतेविषयी चलचित्राचे सादरीकरण करणार आहे. दीड दिवसांपासून पाच, सात व दहा दिवस वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. पारंपारिक भजनांसह जाखडी नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. वेगवेगळे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये 1 लाख 2 हजार 484 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. दीड दिवसाचे 25 हजार 551, पाच दिवसांचे एक हजार 322, सात दिवसांचे 56 हजार 468 तसेच अकरा दिवसांचे म्हणजे अनंत चतुर्थीचे 18 हजार 211 गणेशमर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात दोन हजार 894 पोलिसांचा ताफा असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गणेशोत्सव आनंदमय वातावरणात साजरा करता यावा म्हणून रायगड पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पोलीस उप अधीक्षक 07, पोलीस निरीक्षक 27, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक 128, अंमलदार एक हजार 900, होमगार्ड 500, बाहेरील 30 पोलीस अधिकारी, 300 पोलीस अंमलदार व एक एसआरपीएफ कंपनीचा समावेश असणार आहे.

गणेश विसर्जन ठिकाणांवर दृष्टीक्षेप
समुद्र – 52
खाडी -105
नदी – 244
तलाव – 100
व इतर ठिकाणे – 94
एकूण – 595
1 हजार 150 जणांविरोधात होणार प्रतिबंधात्मक कारवाई
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. परंतु उत्सव साजरा होत असताना काही मंडळी वाद निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी कारवाईचे सत्र हाती घेतले आहे. जिल्ह्यातील एक हजार 150 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम अंतर्गत ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे.
बाजारपेठा फुल्ल
बाप्पाच्या स्वागतासाठी लागणारी फुले, फळे, पुजेसाठी लागणारे साहित्य , तसेच सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये दुकाने सजली आहे. प्लास्टीकच्या फुलांसह, माळा, विद्यूत रोषणाईचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. हे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने बाजारपेठा ग्राहकांनी फुल्ल असल्याचे दिसून येत आहे.
चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी सज्ज
गणरायाचे आगमन बुधवारी(दि.27) होणार आहे. त्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई व ठाण्यात राहणाऱ्या चाकरमान्यांची रायगडसह कोकणात जाण्याची लगबग सुरु झाली आहे. मुंबई, ठाण्यातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रायगडमधून ज्यादा बसेसची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातून 172 बसेस रविवारी (दि. 23) पाठविल्या जाणार आहेत. सोमवारी(दि.25) 27 आणि मंगळवारी(दि.26) 27 अशा एकूण 54 बसेस महाड आगारातून पाठविल्या जाणार आहेत.या बसेस ठाणे व मुंबईतील चाकरमान्यांना घेऊन कोकणात जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सहा ठिकाणी दुरुस्ती पथक
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, एसटीचा बिघाड झाल्यास तातडीने त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागामार्फत जिल्ह्यात सहा ठिकाणी दुरुस्ती पथक नियुक्त केले आहे. खारपाडा, पेण, नागोठणे, कोलाड, महाड, कशेडी या भागात हे पथक नेमण्यात आले आहेत. या पथकामध्ये मॅकेनिक, पर्यवेक्षकांचा समावेश असणार असल्याचे सांगण्यात आले.