एसट्या गेल्या कोकणाला, फटका बसला जव्हारला…अनेक बस फेऱ्या रद्द

49

एसट्या गेल्या कोकणाला, फटका बसला जव्हारला…अनेक बस फेऱ्या रद्द

सुनिल जाबर

जव्हार प्रतिनिधी

जव्हार एसटी आगारातील एकूण ५६ बसेसपैकी ३० बसेस कोकणातील गणेशभक्तांसाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक मार्गांवरील एसटी बसेसच्या फेन्या महामंडळाला रद्द कराव्या लागल्याने त्याचा जोरदार फटका स्थानिक प्रवाशांना बसला आहे. त्यांना एसटी बसची वाट पाहात आगारात आणि विविध थांब्यांवर ताटकळत थांबावे लागत आहे. वाट पाहूनही एसटी येत नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनांतून जादा भाडे मोजून प्रवास करावा लागत आहे.

जव्हार एसटी आगारात मुळातच मागणीच्या तुलनेत बसेस कमी आहेत. त्यामुळे बसेसच्या फेऱ्या कमी होत असल्याने सर्व गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असतात. आता मोठ्या प्रमाणात फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. रद्द केलेल्या फेऱ्यांत काही मुक्कामाच्यागाड्या आहेत. यामुळे सकाळी नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी गावातून लवकर बाहेर पडणाऱ्यांची तारांबळ उडत आहे.

दोन दिवस सुट्टीमुळे गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱ्यांची संख्या वाढली होती. या प्रवाशांना सहकुटुंब स्थानकात बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागले. याबाबत आगार प्रशासनाशी संपर्क केल्यावर वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आदेशानुसार मुंबईला ३० बस पाठवल्या आहेत. गणपतीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांची कमी संख्या लक्षात घेऊन मुक्कामाच्या गाड्या कमी केल्या आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.

जव्हार- कल्याण- पुणे सकाळी ९, जव्हार – बारामती सकाळी ६.४५, जव्हार-शिर्डी सकाळी ६, जव्हार- सेलवास- नाशिक रोड ११, जव्हार – नाशिक-पुणे दुपारी १, जव्हार- कळवण सकाळी ७.४५, जव्हार- बोरिवली सकाळी ८, जव्हार- ठाणे दुपारी २, जव्हार- कल्याण- वाडा दुपारी २, जव्हार- ठाणे सायंकाळी ६, जव्हार-ठाणे दुपारी १, जव्हार-ठाणे सायंकाळी ८.३० या बसेसच्या फेऱ्या महामंडळाने रद्द केल्या आहेत.

त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यांना नाईलाजास्तव खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.