अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा

34

अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा

रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत एक हजार 46 गुन्हे दाखल केले असून, 958 जणांना अटक केली आहे.त्यांच्याकडून 3 कोटी 30 लाख 90 हजार 263 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदेशीररित्या गावठी दारु विक्री, वाहतूक व निर्मिती करणाऱ्या अड्डयांवर छापे टाकून दणका देण्यात आला आहे.
अवैध गावठी दारु विक्री, वाहतूक व निर्मितीला बंदी असताना देखील रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यासह कर्जत, रोहा, अशा अनेक तालुक्यात खुलेआमपणे गावठी दारु तयार करण्यापासून विकणे, त्याची वाहतूक करण्याचा प्रकार केला जातो. धरण, तलाव, ओढा, खाडी किनारी लगत जंगल व झुडपांच्या आडोशाला राहून गावठी दारु तयार करण्यात येत. त्यानंतर ही दारु प्लास्टीकच्या ड्रममध्ये अथवा प्लास्टीकच्या फुग्यात भरून बाजारात विक्रीसाठी आणली जाते. आठवडा बाजारात दारु विकण्यावर अधिक भर दिला जातो. तसेच गावे, वाड्यांमध्ये दारु विक्रीचे धंदे चालविले जातात. अवैध गावठी दारुच्या आहारी जाण्याने आरोग्यावर परिणाम होण्याची भिती कायमच असते. अवैध गावठी दारु विक्री, वाहतूक व निर्मितीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचे सत्र सुरु ठेवले आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या पथकामार्फत छापे टाकण्यात आले आहेत. त्यामध्ये अलिबाग, कर्जत अशा अनेक तालुक्यात कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत ठिकठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यातून एक हजार 46 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच दारुची वाहतूक करणारे 55 वाहने जप्त केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाचे अधीक्षक रविकिरण कोले यांनी दिली.