दारू पिऊन आईला देत होता शिवी; हटकले म्हणून केला वडिलांची हत्या.
अमरावती : जिल्हातील शिरसगावकसबा हद्दीत सालेपुर पांढरी येथे मुलाने वडीलावर चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केलाची घटना घडली आहे. गणेश गायकवाड वय 62, रा. सालेपुर पांढरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलगा मंगेश गणेश गायकवाड वय 32 विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी अटक केली. असे पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांनी सांगितले.
पतिपत्नी, लहान मुलगा व सून हे गावातच वेगळे राहत होते. तर, व्यवसायाने ट्रकचालक असलेला मंगेश हा आपल्या कुटुंबासह गावात शेजारीच राहत असे. त्याला वडिलांनी अर्धी शेती सुद्धा नावे करून दिली. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून आईवडिलांना शिवीगाळ करून त्यांना मानसिक त्रास देत होता. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरासमोर आई नलू गणेश गायकवाड वय 55 या उभ्या असताना, मुलगा मंगेशने काही कारण नसताना आईला शिवीगाळ सुरू केली.
समजूत काढल्यानंतरही तो शांत होत नव्हता. त्यामुळे वडील गणेश गायकवाड यांनी घराबाहेर पडून पत्नीला शिवीगाळ करणाऱ्या मंगेशला हटकले असता, त्याने वडिलांनाही तशीच शिवीगाळ सुरू केली. घरात जाऊन त्याने चाकू आणला. पित्यासोबत झटापट झाल्यावर त्याने चाकूने चार ते पाच सपासप वार केले. रक्ताने माखलेला चाकू फेकून तो फरार झाला.
जखमीस पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची पत्नी नलू गणेश गायकवाड यांनी घटनेची तक्रार शिरसगावकसबा ठाण्यात केली. पोलिसांनी फरार मुलगा मंगेशविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.