मृत्यूनंतरही सुरु आहे लूट; कोरोनाबाधित महिलेच्या मृतदेहावरील मंगळसूत्र गायब.
पतीची चौकशीची मागणी
प्रतिनिधी
गोंदीया :- जिल्हातील अर्जुनी मोरगाव येथील कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब झाल्याचा धकादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे दागिने परत मिळावे म्हणून मृत महिलेच्या पतीने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांकडे लेखी पत्र दिले आहे. यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अर्जुनी मोरगाव पोलिसांना तक्रार घेण्याचे आदेश दिल्याचे समजते.
अर्जुनी मोरगाव येथील एका गर्भवती महिलेला 15 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होते. तिची कोरोना रॅपिड ऍन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यात ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तिला पुढील उपचारासाठी गोंदियाला रेफर करण्यात आले होते. मात्र, तिचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात आणखी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातदेखील तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, कोरोनाबाधित असल्याची खात्री झाल्यानंतर प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी केली. डॉक्टरांनी नगरपंचायत प्रशासनाला कळविले. कर्मचाऱ्यांनी तिचा मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळला. अधिकाऱ्यांदेखत मृतदेहावर स्थानिक तलावाशेजारी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मृताचा पती व नातेवाईकसुद्धा उपस्थित होते.
काही दिवसांनी मृत महिलेच्या पतीला मंगळसूत्राची आठवण झाली. त्यांनी दागिन्यांविषयी नगरपंचायतमध्ये चौकशी केली असता त्यांनी ग्रामीण रुग्णालयात चौकशी करण्यास सांगितले. ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता मृतदेह नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पॉलिथिनमध्ये गुंडाळल्याचे सांगून परत पाठविले.
मंगळसूत्र गेले कुठे, असा प्रश्न करून मृत महिलेच्या पतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी पत्र दिले आहे. या पत्रानुसार, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अर्जुनी मोरगाव पोलिसांना तक्रार घेण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.