बायकोचे अनैतिक संबंध लपविण्यासाठी, सख्ख्या भावाने त्याच्या बायकोसह प्रियकराच्या मदतीने सख्ख्या भावाचा केला खून.
सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी; बायकोचे अनैतिक संबंध लपविण्यासाठी सख्ख्या भावाने त्याच्या बायकोसह प्रियकराच्या मदतीने सख्ख्या भावाचा खून केला. तिघांनी मिळून दिवाळीच्या रात्री संतोषच्या गळ्यावर कोयत्याने वार करून गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर फार्म हाऊसच्या बाजूला खड्डा करून संतोषचा मृतदेह पुरला.
पौड:- बायकोचे दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची भाऊ वाच्यता करेल या भीतीमुळे सख्ख्या भावाने त्याच्या बायकोसह प्रियकराच्या मदतीने भावाचा खून केला. इतकेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात खड्डा करून भावाचा मृतदेह पुरला. मात्र, शेतमालकाला सर्व प्रकार समजल्यावर आठ दिवसानी खुनाला वाचा फुटली आहे. मुळशी तालुक्यातील कुळे गावात हा प्रकार घडला आहे.
संतोष विश्वनाथ बाळेकाई वय 40 असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खुन्याचा सख्खा भाऊ स्वामीनाथ उर्फ उमेश विश्वनाथ बाळेकाई वय 45, अमृता उमेश बाळेकाई वय 38 आणि प्रियकर विजयकुमार नारायण राठोड वय 40 यांना पौड पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद कुलकर्णी यांचे कुळे गावात फार्महाऊस असून तिथे स्वामीनाथ आणि त्याची पत्नी अमृता व विजयकुमार केअरटेकर म्हणून काम करत होते. अमृता आणि विजयकुमार यांच्यात मागील अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. याची माहिती अमृताचा नवरा स्वामीनाथ यालाही होती. दरम्यान, दिवाळीनिमित्त स्वामिनाथ यांचा लहान भाऊ संतोष अक्कलकोटहून त्याच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांना वहिनी अमृताच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली. त्यामुळे संतोषने अमृताची समजूत काढत भावाचा संसार उघड्यावर आणू नको असे सांगितले होते. त्याची माहिती स्वामिनाथला मिळाली. संतोष गावी गेल्यानंतर बायकोचे अनैतिक संबंध सगळ्यांना सांगेल अशी भीती स्वामिनाथला होती. त्यामुळे त्याने पत्नी अमृता, तिचा प्रियकर विजयकुमार यांना सोबत घेऊन संतोषला ठार मारण्याचा कट रचला. त्यानंतर तिघांनी मिळून दिवाळीच्या रात्री संतोषच्या गळ्यावर कोयत्याने वार करून गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर फार्म हाऊसच्या बाजूला खड्डा करून संतोषचा मृतदेह पुरला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी फिर्यादी कुलकर्णी फार्महाउसवर गेले असता त्यांना संतोष दिसला नाही. त्यांनी तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यामुळे कुलकर्णी यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे त्यांनी फार्महाऊस भोवती चक्कर मारली असता एके ठिकाणी त्यांना खड्डा खोदल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तिघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर कुलकर्णी यांनी हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते करीत आहेत.