अभिनेते धर्मेंद्र यांची आज प्राणज्योत मालवली
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र. 7715918136
पनवेल: भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक, सर्वांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारे हिंदी चित्रपट सृष्टीच्या बाॅलिवुड मधील अभिनेते सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या निधनामुळे एक सुवर्णयुग संपले आहे. त्यांच्या अभिनयाने , साधेपणाने व प्रेमळ स्वभावाने त्यांनी कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर कायम राज्य केले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे अभिनय कार्य, त्यांचा आवाज, त्यांचे हास्य सदैव प्रेरणा देत राहील. हिंदी चित्रपट सृष्टीला आपल्या अभिनयाने तब्बल साडे सहा दशके समृध्द करणारे धर्मेंद्र हे ही मॅन ( He man ) प्रतिमेमुळे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले आहे. यामुळे संपूर्ण बाॅलिवुड आणि कोट्यावधी चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांना दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले होते. त्यांना वाढत्या वयामुळे भरपुर समस्या निर्माण झाल्या होत्या. म्हणुन प्रकृती अधिकच गंभीर झाली होती .तेव्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते . परंतु दिनांक 12 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांच्या पत्नी प्रकाश कौर यांनी माझ्या पतीचे पुढील उपचार घरी करावेत. अशी मागणी त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे व आपल्या मुलांकडे केली. त्यानुसार अभिनेते सनी देओल व बाॅबी देओल यांनी धर्मेंद्र यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज घेऊन आपल्या जुहू येथील निवासस्थानी स्थलांतरित केले होते. तेव्हापासून धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या घरीच उपचार सुरू होते. ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील वैद्यकीय पथक वेळोवेळी तपासण्या करून उपचार करत होते. कालपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर होती तसेच ते उपचारांना प्रतिसाद देत होते . पण शेवटी उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. तब्बल सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हिरा हरपल्याने सिनेजगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे.
१९६० ते १९८० या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता म्हणजेच धर्मेंद्र. धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर गुंडाबरोबर चार हात करताना तितक्याच सहजपणे अभिनेत्रींबरोबर रोमान्स केला. म्हणून त्यांना हि मॅन आणि ‘गरम धरम’ अशा नावाने पण ओळखले जाते. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने आतापर्यंत ३५० हून अधिक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
१९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक अॅक्शनपट केले. बिमल रॉय, जे पी दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले. अर्जुन हिंगोरानींनी दिग्दर्शित केलेले त्यांचे चित्रपट खास गाजले. त्यांनी कब क्यू कहा, कहानी किस्मत की, खेल खिलाडी का, कातिलो के कातिल, कौन करे कुरबानी या चित्रपटात एकत्र काम केले. फूल और पत्थर चित्रपटात त्यांनी मीना कुमारींसह काम केले. मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमा मालिनी, रीना रॉय, जयाप्रदा या मोठ्या अभिनेत्रींसह त्यांनी कामे केली.
शोले चित्रपटादरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याची चर्चा होती. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादो की बारात या चित्रपटांमुळे ते अॅक्शन हिरो म्हणून नावाजले जाऊ लागले. हेमा मालिनी सोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली. शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली विरूची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाद्वारे त्यांच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. सनी देओलने ‘बेताब’ तर बॉबीने ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूड पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी पुतण्या अभय देओल साठी ‘सोचा ना था’ या चित्रपटाची निर्मिती केली.धर्मेंद्र यांनी उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते राजस्थान येथील बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनले. २०१२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.









