स्टेट बँकेची सानगडी शाखेत दरोडा; 28 लाखांच्या रकमेसह दीड किलो सोने लंपास.

90

स्टेट बँकेची सानगडी शाखेत दरोडा; 28 लाखांच्या रकमेसह दीड किलो सोने लंपास

भंडारा :- सानगडी भारतीय स्टेट बँक शाखेच्या इमारतीची खिडकी तोडून चोरट्यांनी 28 लाख रोख रक्कमेसह दीड किलो सोने लंपास केल्याची घटना साकोली तालुक्यातील सानगडी येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. साकोली पोलीस घटनास्थळीपोलिसांनी विविध भागातील सीसीटिव्ही फुटेज तपासले आहेत चौकशी सुरू होती.

पोलिसांनी विविध भागातील सीसीटिव्ही फुटेज तपासले आहेत. त्यातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान लॉकर तोडण्यासाठी वापरलेले गॅस सिलिंडर गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथून चोरल्याची माहिती पुढे आली आहे. त्या दृष्टीने आता पोलीस तपास केंद्रीत करण्यात आला आहे. नेमके किती दरोडेखोरे होते याचा अद्यापही अंदाज आला नाही. पोलिसांचे सहा पथक दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संजय खोकले तपास करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर क्राईमचे पथकही दरोडेखोरांच्या मागावर आहेत. लवकरच दरोडेखोरे गजाआड होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

 

साकोली तालुक्यातील सानगडी येथे स्टेट बँकेची शाखा आहे. एका भाड्याच्या इमारतीत ही बँक सुरू आहे. जवळपास 43 गावांचा व्यवहार या बँकेतून चालतो. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे बँकेचे कर्मचारी कामकाजासाठी गेले असता बँकेच्या मागील भागातील खिडकी तोडल्याचे दिसून आले. त्यावेळी बँकेत काही तरी घडल्याची जाणीव झाली. आत जावून बघितले तेव्हा बँकेच्या आतील लॉकर तुटल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तात्काळ साकोली पोलिसांना देण्यात आली. साकोली पोलिसांचे पथक सानगडी येथे पोहचले. सुमारे 28 लाख रुपये रोख दीड किलो सोने चोरीस गेल्याचे पोलीसनी सांगितले.

सानगडी परिसरातील ही महत्वाची बँक आहे. परंतु रात्रपाळीत येथे सुरक्षा रक्षक नसल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे तळ ठोकून आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या काळात साकोली येथील बँक ऑप इंडियाच्या शाखेत धाडसी चोरी झाली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.