नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्ट्यांसाठी पर्यटकांना खुणावतायत वसई-विरार-पालघरचे स्वच्छ, सुंदर अथांग समुद्रकिनारे

56

नाताळ आणि वर्षाअखेरच्या दिवसात नरिमन पॉईंट, बांद्रा बॅण्डस्टॅण्ड, जुहू चौपाटी सारखे शहरातल्या समुद्रकिनाऱ्यांवर बसायला सुद्धा जागा नसते इतकी गर्दी होते. त्यामुळे अथांग पसरलेल्या समुद्राच्या सानिध्यात एकांत शोधण्यासाठी, नवीन वर्ष साजरा करण्यासाठी गेलेल्या या शहरवासियांचा हिरमोड होतो. अश्यावेळी शहरवासीयांसाठी वसई – विरार – पालघरचे अथांग समुद्र किनारे “परफेक्ट न्यू इयर पार्टी डेस्टिनेशन” बनत आहेत.

chrismas and new years parties in mumbai
नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्ट्यांसाठी पर्यटकांना खुणावतायत वसई-विरार-पालघरचे समुद्रकिनारे.

सिद्धांत

मुंबई २४ डिसेंबर २०२१: मुंबई – पुणे – नवी मुंबई हि शहर शैक्षणिक,कला, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिकदृष्ट्या महत्त्वाची शहर. भारतातूनच नव्हे जगभरातून लोक ह्या शहरांमध्ये स्थायिक व्हायला येतात. असं म्हणतात हि शहर, इथली माणसं सहसा कधी थांबत नाहीत, आणि जेंव्हा थांबतात तेंव्हा विरंगुळा म्हणून त्यांची पाऊले मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांकडे वळतात. नरिमन पॉईंट, बांद्रा बॅण्डस्टॅण्ड, जुहू चौपाटीवर नाताळ आणि वर्षाअखेरच्या दिवसात बसायला सुद्धा जागा नसते इतकी गर्दी होते आणि अथांग पसरलेल्या समुद्राच्या सानिध्यात एकांत शोधण्यासाठी गेलेल्या या शहरवासियांचा हिरमोड होतो. काही जण मग वेळ काढून अगदी गोव्याला जातात. पण हे सर्वाना शक्य होत नाही. कोरोनाकाळात लांबचा प्रवास करणे तर महादिव्यच.

अश्यावेळी गेल्या काही वर्षांपासून वसई – विरार – पालघरचे अथांग समुद्र किनारे मुंबई – पुणे – नवी मुंबई शहरातल्या लोकांना खुणावायला लागले आहेत. इकडे वसईचा जुना इतिहास आणि पालघरची विविधरंगी आदिवासी संस्कृती, चमचमीत सीफुड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या तुलनेत गर्दी कमी असल्याने समुद्रकिनाऱ्यावर मिळणार एकांत यामुळे शहरवासीयांसाठी वसई – विरार – पालघरचे अथांग समुद्र किनारे “परफेक्ट वीकेण्ड डेस्टिनेशन” बनत आहेत. तुम्ही पण करताय का इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर सुट्ट्या साजऱ्या करण्याचा प्लॅन? चला तर मग ह्या समुद्रकिनाऱ्यांची आणि आसपासच्या पर्यटन स्थळांची माहिती घेऊ.

वसई बीच: वसईतील “सुरुची बीच” नावाने ओळखला जाणारा हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन. जवळपास पाच किमीवर पसरलेला स्वछ समुद्रकिनारा, किनाऱ्याला लागूनच असलेल्या सुरुची झाडाच्या लांबच लांब रांगा पर्यटकांचे मन मोहवून घेतात. या झाडांच्या थंडगार सावलीत बसून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव फारच विलक्षण असतो. लहानग्यांसाठी इथे छोटेसे खेळण्याचे मैदान आहे. वाळूच्या किनाऱ्यावर घोडेस्वारी आणि उंटस्वारी करण्याची हौससुद्धा पर्यट्क ह्या ठिकाणी पूर्ण करू शकतात. शहरापासून जवळ असल्याने समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक स्थानिक आणि इंटरनॅशनल खाद्यपदार्थांचे रेस्टारंटस आहेत. सुरुची बीचपासून ३ किमी अंतरावरच वसईचा किल्ला आहे. हा किल्ला प्राचीन मराठी साम्राज्याचा, चिमाजी आप्पांचा इतिहासाची साक्ष देत आजही भक्कम उभा आहे. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी तसेच फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी वसई किल्ल्याला एकदातरी भेट देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वसई शहरात अनेक दर्शनीय चर्च आहेत. त्यामुळे मोठ्या वीकएंडच्या सुट्ट्यांमध्ये सुरुची बीच आणि आसपासची पर्यटन स्थळे उत्तम डेस्टिनेशन आहेत. सुरुची बीच जवळच परवडणाऱ्या दरात आणि सुरक्षित अशी अनेक छोटी मोठी हॉटेल पर्यटकाच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.

vasai beach new year
वसई समुद्रकिनारा

कळंब बीच: कळंब बीचचा वापर पर्यटनासाठी तसेच मच्छीमारी या दोन्हीसाठी केला जातो. त्यामुळे या बीचवर फेरफटका मारताना लहान बोटींतून जाळ्यांच्या साहाय्याने  केली जाणारी मच्छीमारी पर्यटकाना पाहायला मिळते. इथला समुद्रकिनारा पोहण्यासाठी आणि वॉटरस्पोर्टससाठी सुरक्षित मानला जातो. कळंब बीचवर ईतव राईडस, वॉटर पॅराग्लायडिंग सारखे साहसी खेळ पर्यटकासांसाठी उपलब्ध आहेत. कळंब बीचला लागूनच राजोडी नावाचा बीच असून या दोन्ही दोन्ही बीचच्या परिसरात अनेक वॉटर रिसॉर्ट्स आहेत. आसपासच्या हॉटेल्समध्ये महाराष्ट्रीयन डिशसोबतच चायनीझ, पंजाबी, गुजराती सारखे चविष्ट खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. इथून तासाभराच्या अंतरावर प्रसिद्ध वज्रेश्वरी गरम पाण्याचे कुंड आणि तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळे फॅमिली पिकनिकसाठी मुंबई जवळील हा समुद्रकिनारा एक उत्तम डेस्टिनेशन आहे.

New year parties at kalamb beach
कळंब समुद्रकिनारा

नवघर बीच: नवघर बीच वसई-विरारमधील कदाचित सर्वात सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. जवळपास साडेचार किमीवर पसरलेल्या काळ्या वाळूच्या या समुद्र किनाऱ्यावरून भल्या पहाटेच्या वेळी फेरफटका मारणे आणि संध्याकाळी क्षितिजावर मावळणारा सूर्य पाहणे हे दोन्ही अनुभव देखनीय असतात. शहराच्या धावपळीच्या आयुष्यापासून हा समुद्रकिनारा दूर आहे.  समुद्रकिनाऱ्या कडे जाणारा रस्ता हिरव्यागार शेतांमधून जातो. त्यामुळे पर्यटकांना गरजेचा असलेला निसर्गाच्या सानिध्यातील एकांत इथे मुबलक प्रमाणात मिळतो. इथल्या सी-फेसिंग हॉटेल्समध्ये बसून चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. समुद्र किनाऱ्याच्या परिसरात अनेक आलिशान रिसॉर्ट्स ते बजेट-फ्रेंडली हॉटेल्स, वॉटर पार्क आहेत. तसेच नवघर बीच पासून अर्नाळा बीच आणि अर्नाळा किल्ला २ किमीवर, प्रसिद्ध जीवदानी मंदिर १० किमीवर आहे. त्यामुळे सलग सुट्टीच्या कालावधीत फॅमिली पिकनिकसाठी  शहरातील पर्यटकांसाठी नवघर बीच एक उत्तम डेस्टिनेशन आहे.

new years parties at navghar beach mumbai
नवघर समुद्रकिनारा

केळवा बीच: जवळपास आठ किमी इतक्या विस्तृत अंतरावर पसरलेल्या केळवा बीच पालघर जिह्यातील एक सुंदर आणि स्वच्छ बीच आहे. केळवा स्टेशन पासून पाच किमीवर असलेल्या केळवा बीचकडे जाणारा रस्ता फळा-फुलांच्या झाडांनी बहरलेला आहे. त्यामुळे केळवा बीचला भेट देताना शहरी पर्यटकांना कोकणातल्या एखाद्या समुद्रकिनाऱ्याला गेल्यासारखा अनुभव येतो. केळवा बीच फोटोग्राफीसाठी नंदनवन मानला जातो. बीचवर शितळादेवीचे मंदिर आहे, जिथे प्राचीन काळात हिंदू देवता रामाचे पुत्र लाव आणि कुश राहिले असल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे. बीचच्या दोन्ही टोकांना प्राचीन किल्यांचे काही अवशेष आजही पाहायला मिळतात. बीचवर चायनिज, स्नॅक्स सोबतच आंबे, चिकू, कैऱ्या, केळी अश्या आजूबाजूच्या गावात पिकणाऱ्या गावठी मेव्याचे स्टॉल्स लागलेले असतात. बीच जवळच पर्यटकांना वास्तव्यासाठी अनेक हॉटेल आणि वॉटरपार्क आहेत. पण त्याचबरोबर स्थानिक लोकांतर्फे चालवली जाणारी टुमदार फार्महाउस पर्यट्कांना इथे उपलब्ध आहेत. तसेच आऊटडोअर कॅम्पिंगचा अनुभव घेणाऱ्या लोकांसाठी कॅम्पिंग साईटची व्यवस्थाही केळवा बीचजवळ उपलब्ध आहे.

kelwa beach new years parties
केळवा बीच