विदर्भ क्षेत्रात उद्योग व प्रकल्पांची कमतरता : खासदार अशोक नेते

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
विदर्भ क्षेत्रात उद्योग व प्रकल्पांची कमतरता असल्यामुळे येथील अनेक युवक बेरोजगार असून रोजगारासाठी भटकत आहेत. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विदर्भात पेट्रोकेमिकल्स व रिफायनरी कॉम्प्लेक्स निर्माण करून लाखो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी ३७७ अधीन राहून मंगळवारी लोकसभेत केली.
या क्षेत्राच्या औद्योगिक विकासासाठी विदर्भ इकानोमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व्दारा पेट्रोकेमिकल्स तथा रिफायनरी कॉम्प्लेक्स ची निर्मिती करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत समीक्षा करून मंत्रालयात पत्रव्यवहार केला आहे. जून २०२१ मध्ये तत्कालीन पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भात पेट्रोकेमिकल्स व रिफायनरी कॉम्प्लेक्स च्या निर्मितीसाठी फिजीब्लिटी स्टडी करण्यात यावे, असे निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सदर काम रखडलेले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास येथील लाखो सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल. ते विकासाच्या प्रवाहात सामील होतील. त्यामुळे विदर्भात पेट्रोकेमिकल्स व रिफायनरी कॉम्प्लेक्स निर्मिती करण्यात यावी अशी मागणी खासदार नेते यांनी ३७७ अधीन सुचनेअंतर्गत लोकसभेत केली.