गंभीर रुग्णाबाबतीत कर्जतकर हतबल
✒️संदेश साळुंके ✒️
नेरळ रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞
कर्जत परिसरात एखाद्या अपघातात गंभीर दुखापत असलेला रुग्ण वाचवण्यासाठी कर्जतकर हतबल ठरत आहेत. सध्या कर्जत मध्ये आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी एकही खाजगी अथवा शासकीय सुसज्ज दवाखाना नाही.
रस्ते अपघात अथवा इतर अपघातात डोक्याला अथवा शरीराच्या नाजूक भागात दुखापत होऊन रक्तस्त्राव होत असेल तर अशा रुग्णास उपचारासाठी कर्जतमध्ये सोय नाही. एम.आर.आय., अद्ययावत ऑपरेशन थेठर,तज्ञ डॉक्टर, अतिदक्षता विभाग या सार्यांचा तुटवडा कर्जत मध्ये असल्याने कर्जत मध्ये गंभीर स्वरूपाचा रुग्ण तातडीने पुढील उपचारासाठी पनवेल,नवी मुंबई अथवा मुंबई दिशेने हलविण्यात येतो. यात उणीव म्हणजे रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होत नसते. सध्या १०८ क्रमांकाची एकच रुग्णवाहिका असल्याने ती इतर रुग्णसेवेत असेल तर तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध असतात अथवा नसतात मात्र ऐन प्रसंगावेळी ग्रामीण भागातून आलेल्या इसमाच्या कनवठीला पैसे असतात अथवा नसतातहि मग हतबल झालेला कर्जतकर दवाखान्याच्या परिसरात पाहायला मिळत असतो. आजही उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे तज्ञ डॉक्टरांचा अभाव असून भूलतज्ञ आहे, परंतु गायनेक (प्रसूती) डॉक्टर नसल्याने शहराबाहेरून आमंत्रित डॉक्टर बोलवावे लागतात.
इतर शहरांच्या तुलनेत कर्जत परिसरातील रस्ते,पाणी,वीज,गटारे यामध्ये काही अपवाद सोडलं तर कर्जत शहर सोयी सुविधांनी बर्यापैकी सुसज्ज आहे. मात्र आरोग्य सारख्या गंभीर समस्येसाठी कर्जत नगपरिषद मधील लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधी उदासीन दिसत आहेत.
असे असले तरी कर्जत उपजिल्हा रुग्णालय अलीकडे उपलब्ध सोयीसुविधा सहित चांगली कामगिरी करीत असताना पाहायला मिळत आहे. उपजिल्हा रुग्णालयात बुधवार – गुरुवार या दोन दिवशी सोनोग्राफी सुविधा उपलब्ध झालेली आहे. एप्रिल पासून आतापर्यंत ११० सोनोग्राफी तसेच डिलिव्हरी २१८, सीझर २४, मोठ्या शस्त्रक्रिया १३० झालेल्या आहेत. रुग्णालय परिसर अधिक स्वच्छ ठेवण्यावर सुद्धा व्यवस्थापनाचा भर आहे.
ट्रोमा केअर सेंटर खालापूर येथे जिल्हास्तरीय व्यवस्थापनातून गंभीर रुग्णा साठी आपत्कालीन व्यवस्था केलेली आहे. परंतु पुढील काळात कर्जत मधील अद्ययावत सुधारणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासन यांचे सहकार्य अपेक्षित आहे.
डॉक्टर विजय म्हसकर
उपजिल्हा रुग्णालय कर्जत रायगड