आरोमा मिशन प्रकल्प आणि अभय पार्श्वमणी ट्रस्टच्या माध्यमातून माणगांव येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नंदकुमार चांदोरकर
माणगाव ता. प्रतिनिधी
8983248048
माणगांव येथे आरोमा मिशन प्रकल्प व अभय पार्श्वमणी ट्रस्टच्या माध्यमातून रोजा पिक लागवडीबाबत दि.22 डिसेंबर 2023 रोजी निळगून येथील बिट्टू फ़ार्म हाऊस या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते. या ट्रस्टचे प्रमुख प्रकाश जैन व दिलीप मेहता यांच्या माध्यमातून भारतीय औषध संस्थान जम्मू यांच्या वतीने रोजा पिकाची शेतीमध्ये लागवड केल्याने शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याबाबतची माहिती डॉ. सी. आर. मीना यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
त्यावेळी प्रकाश जैन यांनी रोजा शेतीबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या माणगांवच्या भूमीत रोजा शेतीची लागवड व्हावी ही माझी बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती. त्या करिता मी जम्मू येथील डॉ. सी. आर. मीना यांच्या सपंर्कात होतो. त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना जम्मू सरकारच्या माध्यमातून सव्वा लाख रोपे शेतकऱ्यांसाठी मोफत आणली असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. रोजा या पिकापासून सुगंधित तेलाचे उत्पन्न मिळते. या तेलाची बाजारात 1400/ रु. किलो किंमत आहे. या तेलापासून अनेक प्रकारची सुगंधित अत्तर, साबण व विविध प्रकारच्या सुगंध देणाऱ्या वस्तू बनतात. याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. अल्पकाळात आपल्या येथील शेतकरी उद्योगपती होऊ शकतो.
या रोजा शेतीची लागवड केली असता ही शेती आठ वर्ष पिक देते. या शेतीला गुरे व रानटी पशु यांच्या पासून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तसेच अति पावसाच्या पाण्यामुळे रोपे नाशवंत होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. स्वतःचा उद्योग करून शेतकऱ्यांनी उद्योगपती व्हायला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना माझे सहकार्य मिळेल असे शेवटी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते शेतकऱ्यांना रोजा रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. सी. आर. मीना, चंद्रपाल सिंग, चिराग गजर, अल्ताफ धनसे, ऍड. तेंडुलकर, बलवत राजपूत, दिनेश गुगले, गफ्फार रहाटविलकर, सिद्धार्थ मोरे, संदेश जाधव, संजय गमरे, रवी गुगले संतोष मोरे व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.