घाटकोपरमधील असल्फा परिसरात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या कारखान्यांमुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत. पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही वर्षांत या भागात अनधिकृत कारखाने सुरू झाले असून त्यातून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेच्या ज्या ‘एल’ विभागामध्ये असल्फा परिसर मोडतो, त्याच विभागाच्या हद्दीतील साकीनाका येथे फरसाण कारखान्याला आग लागून १२ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यानंतरही विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना बेकायदा कारखान्यांवर कारवाई करण्याचे शहाणपण सुचलेले नाही.

असल्फापासून साकीनाक्यापर्यंत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत कारखाने चालवण्यात येत आहेत. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दिवस-रात्र या कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे हा परिसरातील हवा प्रदूषित होऊन जाते. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. या धुरामुळे घरातील वस्तूदेखील काळ्याकुट्ट होऊन जातात, अशी माहिती रहिवाशी सुनंदा अंकुशराव यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here