‘संविधानातील राज्य धोरणांची निर्देशक तत्वे’ यावर आधारित
ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धा २०२२ संपन्न…

ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धा २०२२ संपन्न…
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई – ट्रेनिंग इंस्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलेपमेंट यांच्या विद्यमाने तसेच Free Press Journal आणि दैनिक नवशक्ती यांच्या सहकार्याने रविवार दि. २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ८८४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलपमेंट, हे प्रशिक्षण केंद्र भांडुप, मुंबई विभागात मागील १२ वर्षांपासून कार्यरत आहे. कोणतेही व्यावसायिक उद्दिष्ट नसलेल्या या केंद्राच्या माध्यमातून भांडुप विभागातील गरजू व आर्थिकदृष्ट्या कमकुवत कौटुंबिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्कात विविध प्रकारचे उपयोजित आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते.
याच सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून विविध प्रादेशिक अस्मिता, भाषा, धर्म, संस्कृती यात विभागलेल्या खंडप्राय देशातील नागरिकांना भारतीय अशी अभिमानास्पद सामायिक ओळख देऊन एकत्र ठेवणाऱ्या आपल्या संविधानाच्या उद्दिष्टांप्रति जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा मागील चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे.
२०१९ साली पहिल्या वर्षी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकावर आधारित, २०२० साली दुसऱ्या वर्षी संविधानातील मुलभूत हक्क यावर आधारित, २०२१ साली मुलभूत कर्तव्ये यावर आधारित
तसेच यावर्षी संविधानातील राज्य धोरणांची निर्देशक तत्वे यावर आधारित ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धा राबविण्यात आली.
राज्याचा कारभार कसा चालतो, राज्य लोक कल्याणकारी कसे असावे, राज्याचे ध्येय धोरण कसे असावे तसेच राज्याची कर्तव्ये काय आहेत असे मार्गदर्शन करणारी निर्देशक तत्वे विद्यार्थ्यांना तसेच सर्व सामान्य लोकांना समजावी, संविधानाच्या अंमलबजावणीत लोक सहभाग वाढावा या हेतूने संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी सदर स्पर्धेचे आयोजन केले गेले.
स्पर्धकांनी ह्या स्पर्धेकडे फक्त स्पर्धा म्हणून न बघता स्पर्धेच्या उद्देशाकडे आपलं कर्तव्य म्हणून पहावं याकडे आयोजकांनी स्पर्धकांचे लक्ष वेधले.
सदर स्पर्धेस मुंबईसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
स्पर्धकांनी स्पर्धेचा आनंद घेत आयोजकांचे कौतुक केले तसेच अशाप्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याची विनंती केली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या स्थानिक कार्यकर्ते, संविधान प्रेमी नागरिक व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्कील्स डेव्हलपमेंटच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली त्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.