महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, राज्यातील महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी प्रवेशक्षमतेत वाढ
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, राज्यातील महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी प्रवेशक्षमतेत वाढ

मुंबई
२६ जानेवारी २०२२: महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केलेल्या आराखड्यानुसार वाढवण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षात सुरु असलेल्या कोरोना पँडेमिक दरम्यान राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडला आहे. राज्यभरातील हॉस्पिटलांमध्ये डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील तज्ञ डॉक्टरांची ६४% पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली होती. या साऱ्याचा विचार करून महाराष्ट्र प्रशासनाने राज्यातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

अमरावतीच्या शिवाजीनगर येथील डॉ. पंजाबराव उपाख्य देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 100 वरुन 150 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अहमदनगरच्या डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेज अँड हॉस्पीटलच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 150 वरुन 200 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नागपूरच्या नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 60 वरुन 100 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

धुळ्यातील साक्री रोड येथील अण्णासाहेब चुडामण पाटील मेमेारियल मेडिकल कॉलेजच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 100 वरुन 150 करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अमरावतीच्या श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टि्यूटला बी.एस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशक्षमता वाढ 50 वरुन 100 करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. सन 2021-22 पासून या महाविद्यालयातील बी. एस्सी नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेशक्षमता 100 इतकी राहील.

बीडच्या चिखली येथील परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या अनुराधा  कॉलेज ऑफ नर्सिंगला पदवी अभ्यासक्रमासाठी (बी.एस्सी. नर्सिंग) सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशक्षमता वाढ 30 वरुन 50 करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वंसतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ योगला आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे.सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून ही परवानगी देण्यात आली असून बी.ए.एम.एस. पदवी अभ्यासक्रमाची 40 वरुन 60 (EWS सह 50 वरुन 75) इतकी असणार आहे.

सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here